विविध लेख

 संस्कृतीवाहक चालीरीती : एक आढावा  

------- अलकनंदा साने

 संस्कृतीची एक अत्यंत समर्पक परिभाषा आहे ती अशी की प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार.भारतीय संस्कृती ही देशाच्या इतिहासामुळे, विलक्षण भूगोलामुळे आणि जनतेतील वैविध्यामुळे आकारास आली आहे. शेजारच्या देशांतील चालीरीती, परंपरा व कल्पना सामावून घेत, भारतीय संस्कृतीने सिंधुसंस्कृती दरम्यान जन्माला आलेले तसेच वैदिक काळात, दक्षिण भारतातील लोहयुगकाळात, बौद्ध धर्माच्या उद्भव आणि ह्रासाच्या काळात आणि भारताचे सुवर्णयुग, मुसलमानी आक्रमण व युरोपियन देशांच्या वसाहतींदरम्यान झालेले बदल पचवूनदेखील स्व‌तःचे परंपरागत प्राचीनत्व टिकवून ठेवले आहे. भारतीय संस्कृतीने तिच्या इतिहासाने, अद्वितीय भौगोलिक रचनेने, वैविध्यपूर्ण लोकजीवनाने आणि शेजारील देशांच्या परंपरा व कल्पना स्वीकारून तसेच पुरातन परंपरा जपून आकार घेतला आहे.

भारतात जागोजाग वेगवेगळे लोक, धर्म, वातावरण, भाषा, चालीरीती आणि परंपरा यात वैविध्य दिसत असूनही, आढळणारे साम्य हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. देशभरात पसरलेल्या विविध उपसंस्कृती आणि हजारो वर्षांच्या परंपरा यांची एकत्रित वळलेली मोट म्हणजे भारतीय संस्कृती. ती अनेक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरूंचे व योगशिक्षकांचे आश्रयस्थान आहे. देशातील विविधरंगी धार्मिक उत्सव, संगीत, नृत्ये, स्थापत्यशैली यातील कलात्मक बंध, तशीच भौगोलिक रचना आणि इथला पुरातन व आधुनिक संस्कृतींचा मिलाप ह्या गोष्टी जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करतात.भारतीय संस्कृतीमध्ये प्रांतवार बरेच भेद आहेत. महाराष्ट्रातली संस्कृती आणि आसाम-बंगालमधली संस्कृती, गुजरात, दक्षिण भारत, उत्तर भारत यातली संस्कृती यामध्ये बरेच फरक दिसून येतात. इतकंच कशाला? अगदी गावांचीही संस्कृती म्हणजेच ओळख असते. त्या अर्थाने, पुण्याची संस्कृती, मुंबईची संस्कृतीही असाही फरक करता येईल. आपल्याकडे धर्मांबरोबर अनेक जाती, पोटजातीही आहेत. त्यांचीही स्वतंत्र संस्कृती असते.

मुळात, संस्कृती म्हणजे नेमकं काय अभिप्रेत आहे, ते स्पष्ट व्हायला हवं. फक्त चालीरीती, रूढी-परंपरा, रीतीरिवाज  की वैचारिक, सामाजिक ओळख, मानसिकता  वगैरे वगैरे ? चालीरीतींबाबत नीट विचार केला तर सहज लक्षात येईल की त्या पैकी काही गोष्टी जुन्या काळी योग्य असतीलही. त्या गोष्टी आजच्या काळात, संदर्भात किती उपयोगी आणि व्यवहार्य आहेत, हे तपासून पाहिलं पाहिजे. (जे आपण अजिबात करत नाही). आजच्या काळाच्या अनुषंगाने त्यात बदल करणं गरजेचं असेल तर उगीच परंपरेच्या नावाखाली जुन्या गोष्टी करत राहणं, पाळत राहाणं हे योग्य होणार नाही. पूर्वी माणसं गाव देखील सोडत नसत. त्याकाळी जुने रीतीरिवाज, चालीरीती पाळणं, सोपं आणि सोयीचं होतं. पूर्वीपासून चालत आलेली कुटूंब संस्थाच आता जवळपास निकालात निघाली आहे.

लहानपणापासून मोठं होत असताना व्यक्तीश: आपण कितीतरी बदलत असतो. संस्कृतीचंही तसंच आहे. संस्कृती ही नदीच्या वाहत्या पाण्यासारखी असते. ती थांबली तर तिचं डबकं होईल आणि क्षीण होत जाऊन कालांतराने नाहीशी होईल. या उलट वाहती राहिली तर अनेक प्रवाह, बदल सामावून घेत नव्या रूपात टिकून राहील. काळाबरोबर न बदललेल्या संस्कृती काळाच्या ओघात नष्ट झाल्याचंही आपण ऐकतो. जुन्यातल्या चांगल्याचं सार समजून घेऊन आताच्या संदर्भात बदल करून अवलंबणे, जास्त योग्य ठरेल.  जे पाळत असताना आपल्याला आणि इतरांना त्रासदायक व जाचक ठरणार नाही आणि ते आपल्या मानसिक समाधानासाठी जपणं जर शक्य असेल तर त्याचा कुठलाही बडिवार न करता आणि इतरांवर न लादतां पाळायला काहीच हरकत नाही. त्रयस्थपणे साऱ्या गोष्टींकडे पाहिलं तर लक्षात येतं, सारा मनाचाच खेळ आहे. शेवटी, कुठल्या गोष्टीला किती महत्वं द्यायचं, हे ज्याने त्याने ठरवायचं असतं . 

जुन्या काळापासून चालत आलेले काही रीती रिवाज आणि परंपरांचे पालन आपण अजूनही करतो, पण काही गोष्टी कालबाह्य ठरल्या आहेत, काही एका विशिष्ट स्थान प्रदेशात सीमित आहेत तर काहींची  शहर आणि गाव ह्यात वर्गवारी झाली आहे. आपल्या देशात इतके वैविध्य आहे आणि इतक्या विविध अंगाने ते नटलेले आहे की सगळ्याचा आढावा  एका लेखात घेणे शक्य नाही. मुळात संस्कृती म्हणजे नुसत्या चालीरीती नाही, तर पेहराव, भाषा, राहणीमान असे अनेक घटक आहेत.  ह्या सर्व पृष्ठभूमीसोबत  काही विशिष्ट प्रथांबद्दल आपण ह्या लेखात विचार करणार आहोंत. 

यज्ञोपवीत 
************ 
यज्ञोपवीताची प्रथा अगदी वेदकाळापासून रूढ होती. हे परमात्मा प्राप्तीचे प्रतीक मानले जात होते. कारण परमात्म्याला 'यज्ञ' असा प्रतिशब्द प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. प्रत्येक विधी करताना आणि संस्कार करताना  उदाहरणार्थ ब्राह्मणाने अध्ययन करताना,बटूचे उपनयन करताना, ऋषी तर्पण करताना,श्राद्धाचे भोजन करताना, शवाला अग्नी देताना,मलमूत्र विसर्जन करताना यज्ञोपवीत धारण केले पाहिजे असा एक संकेत रूढ होता. प्राचीनकाळी हे यज्ञोपवीत तीन स्वरूपात वापरले जात असे.'उपनयन विधी' अर्थात मुंजीचा विधी करताना बॅटवर एक संस्कार म्हणून ते  वापरले जात होते, दुसरे परमात्माचे प्रतीक म्हणून आणि तिसरे म्हणजे यज्ञयागादी कर्मावेळी यज्ञोपवीत वापरणे एक आवश्यक बाब मानले जात होते. आजही ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिन्ही वर्णांमध्ये ते वापरले जाते. 
हल्ली जे यज्ञोपवीत वापरले जाते, ताशा प्रकारचे  ते पूर्वीपासून रूढ नव्हते.अगदी प्रारंभी उत्तरीय नावाचे केवळ खांद्यावरून घेतले जाणारे वस्त्रच यज्ञोपवीत म्हणून वापरत असत. त्यासोबत काळ्या रंगाच्या हरिणाचे पण असे. सन सहाशेच्या सुमारास अधिक सोयीची अशी यज्ञोपवीते निर्माण झाली. वेग वेगळ्या ग्रंथांमध्ये कुश गवताचे, सुताचे किंवा गाईच्या शेपटीला असलेल्या केसांपासून तयार केलेले  यज्ञोपवीत देखील चालेल असे म्हटले आहे. नंतर त्याच्या वापराविषयी अनेक बारीकसारीक नियम निर्माण झाले.नाभीच्या खाली नसावे, विधवा स्त्रीने तयार करू नये वगैरे वगैरे. मनुस्मृतीत स्त्रियांनी यज्ञोपवीत घालू नये असे म्हटले आहे, परंतु प्रारंभकाळात स्त्रीलादेखील उपनयन करण्याचा आणि  यज्ञोपवीत घालण्याचा अधिकार होता.
गेल्या काही वर्षांपासून पुरुषांनी देखील यज्ञोपवीत घालणे सोडले आहे. काही विशिष्ट निमित्ताने ते तेव्हढ्यापुरते धारण केले जाते, पण इतर वेळेस ते घालणे जाणीवपूर्वक टाळले जाते असे दिसून येते. ते परमात्माकडे नेणारे एक प्रतीक आहे, ह्यावर कोणाचा विश्वास उरलेला नाहीय आणि म्हणून ते मिळविण्यात अर्थ नाही, ही धारणा तयार झाली आहे. 

लग्नसोहळ्यातील वीर 
************************* 
आपल्या संस्कृतीत विवाह हा सर्वात महत्वाचा विधी मानला गेला आहे. त्याला धार्मिक आणि कौटुंबिक महत्व तर आहेच, सामाजिक महत्व देखील तितक्याच  मोलाचं आहे. खेडेगावात तीन/चार दिवस संपूर्ण गावाची चूल विश्रांती घेते तो लग्नसोहळा सर्व दृष्टीने मोठा आणि चांगला समजला जातो. अलीकडे श्रीमंतांची लग्नं सुद्धा एक एक  आठवडा 'इव्हेंट' ह्या नावाखाली होत असतात. तर इतक्या महत्वपूर्ण प्रसंगात पूर्वी 'वीर नाचवणे', तितकेच महत्वाचे असे. ह्या प्रकारचे सखोल अध्ययन केले तर असे आढळते की हा विधी संस्कृत किंवा जुन्या मराठी साहित्यात आढळत नाही. मग हा प्रश्न उरतो की हा वीर कोठून आला ? मध्यकाळात जेंव्हा राजकीय अस्थिरता होती, परकीय आणि विशेषत्वे मोगलांचे साम्राज्य असताना त्यांचे सैन्य लुटालूट करून दहशत निर्माण करत असे, लग्नमंडपातून वधूला पळवून नेत असे, लग्नात असलेल्या उपस्थीची रोकड व दागिने लुटून नेत असे, तेंव्हा स्वसंरक्षणासाठी एक लढाऊ टोळी तयार केली जात असे, तिचेच बदललेलं स्वरूप म्हणजे 'वीर नाचवणे' आहे. मोगलांप्रमाणेच एखादे वेळेस शेजारचा सरदार, मनसबदार देखील अशी कृत्यं करत असे आणि म्हणूनच ह्याला हळूहळू  एक धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. 

 साठ - सत्तर वर्षांपूर्वी साजऱ्या होत असलेल्या विवाहात नवरा देवदर्शनासाठी जाताना, व्याही मंडळींसाठी न्याहारी नेताना, रुखवताची भरलेली ताटं किंवा इतर वस्तू मिरवणुकीने नेताना हा वीर नाचवला जाई. असा वीर नाचविण्यासाठी त्याला तयार करण्याची विधीसुद्धा मजेदार असे. गावातल्या दणकट तरुणाची ह्यासाठी निवड केली जात असे.त्याचे कपडे काढून उघड्या अंगावर तेल चोळले जाई, कपाळाला गुलाल फसला जाई. धोतराला काचे मारून एक जाडजूड धोतर त्याच्या कमरेला गुंडाळून त्याची दोन्ही मागील  टोकं,दुसऱ्या  दोन बळकट तरुणांच्या हाती दिली जात असत. ह्या तरुणांच्या हातात ढालीचे प्रतीक म्हणून सूप तर वीर असलेल्या तरुणाच्या हातात तलवारीचे प्रतीक म्हणून जडशीळ काठी असे. मिरवणुकीत  चालताना ही शस्त्र हाती घेऊन त्यांचे लुटुपुटुचे युद्ध होत असे. वार आणि प्रतिकार दोन्हीचा हा खेळ सुमारे तास दीड तास चालत असे. हा अवधी मिरवणुकीच्या लांबीप्रमाणे कमी जास्त होई. 
मिरवणूक पूर्ण झाल्यावर नदी किंवा ओढ्याकाठी वीराची पूजा होई.त्याला मग उघड्या अंगानेच माघारी आणले जात असे. मग तो आपले कपडे चढवून चपला घालत असे, कारण उघड्या अंगासोबत पायही अनवाणी असत. शेवटी ज्या कुटुंबात लग्न असे त्याचा प्रमुख मग त्याला अहेर करत असे. 

आराधी 
********* 

खेडेगावात नवरात्रात आणि त्या नंतरही एक महिना येणारा पाहुणा म्हणजे "आराधी". काही खेड्यांमध्ये तो वस्तीलाच असतो आणि दर मंगळवार - शुक्रवार घरोघरी जोगवा मागतो. आपल्या कडील मान्यतांप्रमाणे गायन-वादन आणि नृत्य ह्या कला ईश्वराची आराधना करण्यासाठी निर्मित झाल्या. आराधी ह्या मान्यतेचं मूर्तिमंत प्रतीक आहे. नवरात्रात आराधी आपल्या साथीदारांसह अंगणात येऊन देवीची गाणी म्हणतो. त्याच्या गळ्यात संबळ नावाचे वाद्य असते.त्याची वेशभूषा अनोखी असते. तेलकट सैलसर झब्बा, कवड्यांच्या टोप, अंगभर कवड्यांचे दागिने, गळ्यात देवीचा टाक घालून तो गावभर फिरतो. एक दोन गाणी म्हणून तो घरमालकाकडे जोगवा मागतो. जोगव्यात काहीही घातले तरी चालते. काही नाणी देखील लोक त्याच्या परडीत टाकतात आणि आराधी त्यांच्या कपाळी तेलकट राख अंगारा म्हणून लावतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. 

आराधी होण्याचा एक विधी असतो. ज्याला आराधी व्हायचे असते तो हा विधी पूर्ण करण्यासाठी  कोल्हापूर-तुळजापूरला जातो. ज्यांना तेथे जाणे शक्य नसते ते गुरु आराधीला बोलावून घरीच हा विधी करतात. स्त्री-पुरुषातील भेदभाव ह्या प्रथेत देखील आढळतो. पुरुष आराधी विवाहबद्ध होऊ शकतात, पण स्त्री आराधीणीला ह्याची परवानगी नाही.

आराधी असलेल्याला रोजचे धार्मिक विधी करावे लगत नाहीत. मंगळवार - शुक्रवार कमीतकमी पाच घरी जोगवा मागणे एवढीच अट असते. नवरात्रात आणि चैत्रपौर्णिमेला देवीचा छबिना निघाल्यावर त्यापुढे नाचणे, देवीची  गाणी म्हणणे , हे त्याचे काम असते. ह्या वेळी यल्लमादेवीचे ''जोगती'' भक्त ह्यात सामील होतात. 

गुग्गुळ विधी 
*************** 

आपल्या संस्कृतीत विवाह संस्काराला खूप महत्व आहे. अग्नीच्या साक्षीने सहजीवनाला सुरुवात होते. विवाहसोहळ्यात अग्नीला वेगवेगळ्या स्वरूपात स्वीकारले जाते. त्यापैकी ''गुग्गुळ'' या नावाने अग्नीचा स्वीकार व त्यासोबत केलेले विधी अजूनही अनेक ठिकाणी रूढ आहेत. कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात तर ते अत्यावश्यक आहेत. महाराष्ट्रात पाटील, कुलकुर्णी यासारख्या बड्या मंडळींकडे लग्नात धनगर लोक चितारलेली मडकी घेऊन ढोलाच्या तालावर जे नृत्य करीत त्याला गुग्गुळ असे नाव होते. देवासमोरही हा नाच केला जाई. मडके म्हणजे सजवलेला देह आणि तो देवासमोर अर्पण करायचा असे काहीसे ते प्रतीक असे. असे नृत्य केल्यानंतर पाटील, कुलकुर्णी त्यांचा बहुमान करीत असत.  कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात मंगलकार्यानंतर  एक धार्मिक विधी केला जातो, ज्यात घरातील लोक धगधगत्या निखाऱ्यांवरून चालत जातात. त्याला  गुग्गुळ असे म्हणतात.

महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात लिंगायत लोकांच्या लग्नात गुग्गुळहा प्रमुख विधी असतो.राख भरलेल्या दोन माठात, एक पणती तेवत ठेवतात. पणती पेटविण्यापूर्वी त्यावर गुलाल, बुक्का, हळद, कुंकू उधळतात आणि गंध लावून माळ घालतात. मग हे दोन्ही माठ दोन जंगम किंवा नवऱ्यामुलाचे दोन नातेवाईक वाजतगाजत गावाबाहेर नदी किंवा विहिरीवर घेऊन जातात.या मिरवणुकीबरोबरच वीरचंद्र किंवा वीरभद्र नाचत नाचत सामील होतो. वीरचंद्र किंवा वीरभद्र, जंगम समाजातलाच असावा लागतो. इच्छित स्थळी गेल्यावर कुटुंबप्रमुख जंगमांना, वीरभद्राला नारळ,दक्षिणा आणि आहेर देतो. काही ठिकाणी पणती विझवून  माठ देवळात ठेवतात, काही ठिकाणी फोडून टाकतात. 

नैतिक शिक्षण आणि कृतज्ञताला संस्कार बनविण्यासाठी , प्रतीकात्मक स्वरूपात हा अग्नी पूजला जात असावा, असे वाटते. 

साती आसरा 
*************** 

आर्य आणि द्रविड संस्कृती जेंव्हा एकमेकांच्या सहवासात आल्या तेंव्हा इतर सर्व गोष्टींबरोबर देवीदेवतांची देवाणघेवाणही झाली. दोन्ही संस्कृतीतील गुणविशेष या देवतांमध्ये एकरूप झाले.लोकसंस्कृतीत काल परवापर्यंत प्रतिष्ठित असलेली ''साती आसरा '' ही ग्रामदेवता ह्याच स्वरूपाची आहे. अशी धारणा आहे की या साती आसरा जलाशयाजवळ किंवा पाण्यात राहणाऱ्या देवता आहेत. या पिशाच्चसदृश देवता आहेत आणि पाण्यात उतरलेल्या  एकट्या- दुकट्या माणसाचा त्या बाली घेतात, तरुण स्त्रिया व लहान मुलांना बाधा करतात.एक वर्षाच्या आतील मुलांना त्यांचे अधिक भय असते. ह्या धारणेपायी बाळ सव्वा महिन्याचे होताच त्याला नवे कपडे घालून, तीट-काजळ लावून, या देवीच्या पायावर घालण्यासाठी बाळाची आई व इतर स्त्रिया जातात. तिची पूजा करून ओटी भरतात आणि बाळाला तिचा अंगारा लावतात. या देवतांची संख्या सात मानली जाते आणि म्हणूनच त्यांना साती आसरा म्हणतात. साती आसरा शिवाय या देवतांना अनेक नावांनी ओळखले जाते. त्यांना लाडूबाई,काळूबाई,जोखाई,तुकाई,भेकरे, सटवाई वगैरे नावे दिल्याचे आढळून येते. या देवींना कुमारिका मानले जाते. 

साती आसरांना प्रसन्न करण्यासाठी पूर्वी कोंबडा, बकरा यांचा बळी दिला जात असे. गेल्या चाळीस पन्नास वर्षात त्यात बदल झाला आहे. आता पुरणपोळी,खीर सारख्या  पदार्थांचा नैवैध्य दाखविला जातो. नदीकाठी सात लहान आकाराचे दगड शोधून त्यांची पूजा केली जाते आणि लहान बाळाला त्यांच्यासमोर ठेवले जाते. 
 गोंड लोकांत या साती आसरा विषयी अनेक दंतकथा प्रचलित आहेत. बिहारमध्ये हिला ''जरा'' म्हटले जाते आणि अत्यंत क्रूर देवता मानले जाते. तिकडेही ह्यांची संख्या सातच आहे. बिहारी लोक भिंतीवर चित्र काढून तिची पूजा करतात.

मंगळसूत्र 
*********** 
 स्त्रियांसाठी आपल्या संस्कृतीत मंगळसूत्र,जोडवी,कुंकू,बांगड्या आणि नथ हे  एकूण पाच दागिने  सौभाग्यलेणे ठरविले गेले आहेत. कुंकू आणि बांगड्या मुली लहानपणापासून वापरतात. नथ कधीमधी तर जोडवे सोयीनुसार, पण मंगळसूत्राचा वापर मात्र अजूनही प्रामुख्याने होतो. मंगळसूत्र ह्या शब्दातच त्याचा अर्थ सामावलेला आहे म्हणजे वधूसाठी आयुष्याची पुढील वाटचाल शुभ आणि कल्याणकारी ठरो, ही शुभेच्छा त्यात आहे, पण मंगळसूत्राचा उल्लेख वैदिक विवाह पद्धतीत , वेदांमध्ये किंवा कुठल्याही प्राचीन वाङ्मयात नाही. ही प्रथा बहुधा द्रविड संस्कृतीतून आपल्या संस्कृतीत रूढ झालेली दिसते. तामिळनाडू आणि केरळमध्ये ''तालिकेत्तू कल्याणम'' या नावाचा एक समारंभ असतो. त्या समारंभात केशराचे पाणी दिलेली काली पोत ओवून तयार झालेली ''ताली'' वधूच्या गळ्यात बांधतात.ह्या प्रथेवरूनच बहुधा मंगळसूत्र अस्तित्वात आले असावे. दक्षिणेकडून आलेली ही प्रथा कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरातपर्यंत दिसते, पण अजूनही उत्तर भारतात त्यास तितकेसे महत्व मिळालेले नाही. 

आपल्याकडे मंगळसूत्र बांधणे हा लग्नविधीचा भाग आहे, पण कोईमतूरच्या तियत जमातीत मुलगी वयात येण्यापूर्वीच ताली बांधण्याचा समारंभ होतो. बिहार, ओरिसाच्या संथाल जातीत वधू-वराच्या गळ्यात लोखंडी  तोडा  बांधतात. तामिळनाडूच्या कल्लर जातीत लग्नासाठी जमलेली सर्व मंडळी  तालीला आधी हात लावतात मग वराची बहीण ती ताली वधूच्या गळ्यात बांधते. दक्षिण कोकणात देवदासीकडून  मंगळसूत्र ओवून घेतात, कारण देवदासी सदैव सौभाग्यवती  मानली जाते.आसामच्या कुकी जमातीत पुरोहित वर-वधूला दारू प्यायला देतो व नंतर वधूच्या नव्हे तर वराच्या गळ्यात सुताचे दोन धागे बांधतो.

महाराष्ट्रातल्या बहुतेक जातीत मंगळसूत्राच्या दोन वाट्या असतात- एक माहेरची, एक सासरची. सीकेपीत एकच वाटी असते आणि पोतही एकपदरीच असते. 

कावळा आणि लोकाचार 
************************** 

लहान बाळाला गोष्ट सांगताना किंवा त्याही आधी ते बाळ बसू लागल्यावर हाताच्या बोटाने गाणं म्हणत  ज्या पक्षाची ओळख त्यास होते तो म्हणजे कावळा. बाळाला जे  पहिलं गाणं शिकविलं जातं ते म्हणजे 'काऊ काऊ ये , चू चू ये दाणा खा पाणी पी' हे होय आणि पहिली गोष्ट ऐकविली जाते ती म्हणजे 'एक होता कावळा आणि एक होती चिमणी' ही होय. मूल खाऊ लागलं की 'एक घास काऊचा' असे म्हणत घास भरविला जातो.  इतकंच नाही तर एक संपूर्ण आयुष्य जगलेल्या माणसाच्या आत्म्याला मुक्ती मिळाली की नाही हे देखील कावळा ठरवतो. इतके अनन्य साधारण महत्व मिळालेल्या ह्या पक्षाला दैनंदिन जीवनात   कोकीळ, पोपट, कबुतर, मोर, हंस, गरुड वगैरे  इतर पक्षांसारखा मान मिळत नाही. उलटपक्षी त्याच्यात असलेल्या उणिवांमुळे तो अपशकुनी ठरविला जातो. त्याचा काळा रंग, त्याने एकाच डोळ्याने बघणे, त्याची बुद्धिमत्ता म्हणजे बेरकीपणा इत्यादींबद्दल तुच्छतेनं उल्लेख होतो.

ह्या उलट लोकजीवनातच नव्हे तर खुद्द ज्ञानेश्वरांनी सुद्धा त्याला शुभशकुनी म्हटले आहे. ते म्हणतात ---पैल तो गे काऊ कोकणात आहे/ शकुन गे माये/ सांगताहे. आजही खेड्यामध्ये अंगणातल्या झाडावर बसून कावळा ओरडला तर 'आपल्याकडे कोणीतरी प्रिय व्यक्ती येणार' असा समज आहे. लहान मुलाने दूधभात  खाताना जर काही कण सांडले आणि अंगणात येऊन ते कावळ्याने खाल्ले तर ते शुभशकुनी मानतात. पण त्याला अंत्यविधीतही समाविष्ट केले आहे म्हणून कावळ्याचा स्पर्श कोणाला झाला तर ते अभद्र समजले जाते आणि ते विघ्न टाळण्यासाठी तो माणूस मरण पावला अशी खोटी बातमी पसरविली जाते. पूर्वी हे सर्व शहरातही असायचे, पण आता ते लोप पावले आहे. एक पद्धत अजून होती. एखाद्या बाईला मासिक पाळी सुरु झाली की तिच्या लहान मुलांनी तिला शिवू नये म्हणून त्यांना सांगितले जायचे-- आईकडे नको जाऊ, तिला कावळा शिवलाय. 

कावळा तसा  निरुपद्रवी आणि उपयोगी आहे. जनावरांच्या पाठीवरचे आणि म्हशीच्या कानात असलेले  किडे तो खातो. अंगणात किंवा आता बाल्कनीत सांडलेले अन्नाचे कण खाऊन टाकतो व एक प्रकारे स्वछतेस हातभार लावतो. 


वेळ अमावस्या 
***************** 

आपल्या संस्कृतीत नाते संबंधांवर भर दिला गेला आहे. म्हणूनच ज्या वस्तू आपल्या नित्य उपयोगाच्या आहे, त्यांच्या विषयी  कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांची पूजा करण्याचा प्रघात आहे. इतकंच नाही तर जमिनीला आई संबोधून हे नातं आणखी घट्ट केलं जातं.शेतकरी भूमीला काळी आई म्हणतो. या काळ्या आईचे आभार मानण्यासाठी शेतकरी मार्गशीष महिन्याच्या शेवटल्या दिवशी   अनेक विधी करतो आणि ह्या अमावस्येला ''वेळ अमावस्या'' म्हणतो. आपल्या कृषी प्रधान देशाच्या अप्रतिम संस्कृतीचे त्या निमित्त एक सोज्वळ दर्शन घडते. आमच्या समशीतोष्ण देशात मार्गशीर्ष म्हणजे थंडी संपलेली असते, उन्हाळ्याची सुरुवात झालेली नसते. हवा छान असते.खरीपाची  पीक यायला अवकाश असतो. रबीची  सर्व कामं आटोपलेली असतात. एकूणच तृप्ततेची भावना असते. शेतकऱ्यांसाठी ही सण साजरा करण्याची वेळ असते. 

मार्गशीर्ष अमावास्येला घरातला कर्ता पुरुष सकाळी सकाळी  गार पाण्याने आंघोळ करतो.चांगले कपडे घालतो आणि आदल्या दिवशी कुंभाराकडून आणलेल्या माठावर चुन्याने रेघा काढतो. मग कुंकवाचे पट्टे ओढले जातात. त्यात घरची कर्ती स्त्री  रात्री करून ठेवलेली आंबील ओतते. नैवैद्यासाठी ज्वार बाजरीचे मुटके किंवा पुरणपोळी केली जाते. मग घरातील सर्व मंडळी शेतावर जातात आणि माठाची पूजा करतात. आंबील, मुटके, पुरणपोळी प्रसाद म्हणून घेतले जातात. नंतर तो माठ पांढऱ्या नव्या कपड्याने बांधून जमिनीत पुरला जातो. 

काही प्रदेशात पाच माठ घेतले जातात.  दक्षिण भारतात कुणबी  आश्विन पौर्णिमेला शेतातील सहा दगड वेचून त्यांना चुना व गेरूचे ठिपके लावतात. हे पाच पांडव आणि कुंती असे समजून त्यांची पूजा केली जाते. म्हैसूरमध्ये शानार  लोक दोन ओबड धोबड दगडांची देव व देवी म्हणून पूजा करतात. उत्तर भारतात ग्रामदेवता म्हणून एखाद्या झाडाखाली दगडांची रास रचलेली असते. कोल्हापूरचा जोतिबा व त्याची पत्नी यमाई यांचीही पाषाण प्रतीकेच आहेत. 
शेलकट
********** 
मराठा आणि खंडणी मानल्या जाणाऱ्या समाजात मागील शतकात शेलकटाची प्रथा  होती. घराबाहेर पडताना स्त्रियांनी अंगावर असलेल्या कपड्यांसोबत संपूर्ण अंग झाकले जाईल असे पांढरे वस्त्र परिधान करणे आवश्यक असायचे. त्या काळात ही प्रथा अगदी काटेकोरपणे पाळली जात असे. शेलकटासाठी पाच साडेपाच फूट लांबी रुंदीचा सुटी कापडाचा मोठा कापड घेतला जाई आणि त्याला चारी बाजूने शिवण घातलेली असे. ह्या कापडाला काठ,पदर, रंगकाम किंवा इतर कुठलीही सजावट केली जात नसे. ऐपती प्रमाणे कापडाच्या दर्जात फरक असला तरी बाह्य दर्शनी तो एकसारखाच दिसायचा. असं हा शेलकट अंगाभोवती गुंडाळायचा आणि मगच घराबाहेर पडायचे. काही ठिकाणी त्याचा पदर चेहऱयावरून घुंघटासारखा घेतला जाई.

सण समारंभ,लग्नकार्य,देवदर्शन,जत्रा कोठलाही प्रसंग असो, महागातल्या महाग साडीवरही  शेलकट पांघरणे प्रत्येक स्त्रीला जरुरी असे. एरवी देखील सार्वजनिक ठिकाणी जाताना किंवा इतरत्र कुठे जाताना जर वाटेत एखादं असं सार्वजनिक स्थळ असेल जिथे पुरुष माणसांची वर्दळ असे, शेलकट अंगावर असायलाच पाहिजे असं सामाजिक संकेत होता. जेंव्हा परकीय सैन्य येऊन गावात धुमाकूळ घालत असत तेंव्हा जाणारी व्यक्ती स्त्री की पुरुष हे समजू नये ह्यासाठी कदाचित शेलकट जन्माला आले असेल, नंतर त्याचे प्रथेत रूपांतर झाले असावे असा खेड्यातील म्हाताऱ्या माणसांचा कयास आहे. 

अशाप्रकारे आपल्या संस्कृतीत असलेल्या काही चालीरीती, समज, श्रद्धा ह्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आपली संस्कृती खूप व्यापक आहे. असं म्हणतात की आपल्या देशात  दर दोन कोसावर पाणी आणि वाणी(भाषा) बदलते. त्याच प्रमाणे जगण्याची पद्धतही बदलते, म्हणूनच ह्या लेखात दिलेली माहिती सर्वकालिक किंवा सर्वव्यापी ठरू शकत नाही, ह्याची जाणीव आहे. मुळात, संस्कृती म्हणजे नेमकं काय अभिप्रेत आहे, ते स्पष्ट व्हायला हवं. जसं पूर्वी सर्व  स्त्रिया नऊवारी लुगडं नेसत होत्या. त्यानंतरच्या काळात पाचवारी साडी आली. आता अनेक स्त्रियांना कामानिमित्त घराबाहेर पडावं लागतं त्यामुळे त्यांना सुटसुटीत असा परिधान  सोयीचा वाटतो. हा काळानुसार आणि बदललेल्या परिस्थितीला अनुसरून केलेला आणि स्वीकारलेला बदल आहे. पुरुषांचं धोतर, कोट, टोपी जाऊन शर्ट-पॅंट हे कपडे आले. अलीकडे तर मुली टी-शर्ट्स, जीन्स , शॉर्ट्‌स घालतात.  आता ही एक वेगळी संस्कृतीच म्हणावी लागेल. पूर्वी शेणाने सारवलेल्या जमिनीवर हातपाय धुऊन पाटावर बसून समोर मांडलेल्या ताटाभोवती (केळीचं पान किंवा पत्रावळही) चित्रावळ घालून श्लोक म्हणून केवळ 'उदरभरणं' न समजता 'यज्ञकर्म' समजून भोजन करायची पद्धत होती. तिथे चित्रावळीला अर्थ आणि संदर्भ होता. आता  पंधराव्या, विसाव्या मजल्यावर डायनिंग टेबलासमोर बसून जेवणाऱ्याने किंवा पायातले चपला-बूट न काढता उभ्यानेच जेवण करणाऱ्याने चित्रावळ कुठे आणि का घालायची? त्याचा संदर्भच नाहीसा झाल्यावर संस्कृती म्हणून ते जोपासणं, हास्यास्पदच दिसेल. जुन्या काळातल्या काही चुकीच्या आणि अनिष्ट प्रथांचा आपण त्याग केलाच की (उदा. सतीची चाल, केशवपन इ.) तो आपल्या संस्कृतीचाच भाग होता. म्हणजेच बदलत्या काळाप्रमाणे आपण सुधारणा स्वीकारल्या आहेत . 

ह्या अनुषंगे अनेक प्रथा कालौघात बाजूला गेल्या. उदाहरणार्थ वेदकाळात इंद्र,वरुण, अग्नी, उषा आणि पर्जन्य ह्या देवतांची पूजा केली जात असे. नंतरच्या काळात भैरव, मल्हारी,जोतिबा, भवानी यांची पूजा रूढ झाली. नवस केले जायचे आणि बकऱ्याचे बळी दिले जायचे. हे प्रमाण आता कमी झाले आहे. माणसाने चांगले वागावे, प्रकृतीची, पर्यावरणाची रक्षा करावी, सामुदायिक  भल्याचा विचार  करावा, प्राण्यांचे रक्षण करावे असे अनेक  उदात्त विचार करून चालीरीती जन्माला आल्या. नंतर ज्ञानाच्या नवीन  वाटा सापडल्या आणि आंधळेपणाने जे स्वीकारले होते ते अपरिहार्य रित्या  हळूहळू नष्ट झाले.

ह्याचा अर्थ असा नाही की पूर्वीच्या सर्वच  चालीरीती टाकाऊ होत्या. चालीरीती  काळाप्रमाणे ठरतात आणि त्या त्या काळात योग्य असतात. त्यांच्यामुळे जगण्यासाठी एक मानसिक बळ मिळतं. माणूस आपले दैनंदिन दुःख आणि कष्ट विसरून त्या पद्धतींना पूर्ण करण्यास गुंततो. त्यामागे त्याची एक श्रद्धा असते, भक्तिभाव असतो जो त्याला जगण्याची नवी उमेद देतो. म्हणूनच आजही जुन्या चालीरीती निरक्षर आणि ग्रामीण भागात तग धरून आहेत. मध्यंतरीच्या काळात ह्या चालीरीतींना चुकीचे स्वरूप दिले गेले. श्रेष्ठ कनिष्ठ भाव, जातीयतेवर आधारित क्रूरता,शोषणासाठी घेतलेला धर्माचा आधार, स्त्रियांना दिली जाणारी पक्षपाती वागणूक इत्यादी अनेक गोष्टी अत्यंत वाईट होत्या आणि अमानवीय होत्या, पण चालीरीतींचा मूळ गाभा आणि ज्या तत्वावर त्या आधारित होत्या त्या कालसापेक्ष नव्हे तर आजही आदर्श समाज पद्धतीचे आदर्श उदाहरण ठरतील. ती एक जीवनशैली आहे आणि त्यात जीवनाधार सामावलेला आहे हे नक्की. 

(संदर्भग्रंथ  -- संस्कृतीच्या पाऊलखुणा / लेखक द.ता.भोसले) 

भाषेचं बदलतं स्वरूप
अलकनंदा साने

वॉव ! किती क्यूट 
 लव्हली 
अमेझिंग 
मी पोस्टतेय, 
सेन्डू का  तुला 

अशा शब्दांनी ओथंबलेली भाषा ऐकताना आता आपल्याला दचकायला होत नाही. हे शब्द आत्ता आत्ता पर्यंत आपल्या फारसे ऐकिवात नव्हते. आपण सरळ सरळ नवीन पिढीवर  ह्याचं खापर फोडून मोकळे होतो.पण मला  थोडं भूतकाळात शिरावसं वाटतंय. माझी पिढी म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती काळाच्या आसपास जन्माला आलेली पिढी. 'आनंदी आनंद गडे', असं चोहीकडे वातावरण असताना ह्या जगात आलेली पिढी. सर्व साधारणपणे बहुतेक कुटुंबं कनिष्ठ मध्य वर्गातली, फारसं उत्पन्न नसलेली.म्हणजे लहानपण अगदी हलाखीत नाही तरी विशेष सुबत्ता नसलेलं. नंतर नवरा बायको दोघेही कमावत आहे, हे दृश्य दिसू लागलं. काही वस्तू घरात दिसू लागल्या आणि आम्हाला त्याची चटक लागली.अकस्मात एक दार आम्हाला दिसलं, इंग्रजीचं . जे दार उघडून परदेशी जाता येत होतं, खूप पैसा कमावता येत होता. म्हणून मग आम्ही आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकायला पाठवलं. इंग्रजी शिकून आमच्या मुलांनी अमेरिकेत जावं, युरोपच्या एखाद्या देशात जावं, अगदीच काही नाही जमलं तर दुबई किंवा सिंगापूरला जावं.पण आपल्या देशात राहू नये, आपली भाषा बोलू नये.हा आमचा आग्रहच नाही तर हट्ट होता. मुलं बिचारी इंग्रजी  शिकली , त्यात वावरायला लागली आणि मग आपले डोळे हळू हळू उघडायला लागले. आम्हाला चपराक बसली.पण आता काहीच हातात उरलेलं नाहीय, ही जाणीव व्हायला सुद्धा बराच अवधी लागला.

मला इथे ज्येष्ठ कवयित्री अरूणा खरगोणकरांची ''त्याची भाषा कोणती'' ही  कविता आठवतेय. ह्या कवितेत मुलगा  विचारतो--

आई ! माझी भाषा कोणती ?

पुढे  तो म्हणतो माझ्या मराठीला  पुण्याचे काका हसतात , हिंदी ऐकून शेजारचे  चाचाजी खिल्ली उडवतात तर इंग्रजीच्या बाई म्हणतात तू देसी अंग्रेजी बोलता है.आणि शेवटी तो विचारतो 

आई !  माझी नक्की भाषा कोणती ?

हा एक मार्मिक प्रश्न आहे , जो आपण नवीन पिढी समोर उभा केला आहे. इंग्रजीचं लोण इतकं पसरलंय की आपल्या घरात कामा निमित्त  येणारे अर्ध शिक्षितसुद्धा तीच भाषा वापरतात.माळी आता कोरफड किंवा स्थानिक भाषेत ग्वारपाठा म्हणत नाही, तो एलोवेरा म्हणतो, गुलाब नाही रोझ  म्हणतो.रात्रीचा राखणदार सांगतो- नाईट में व्हिसल मारा था. धुणं-भांड्याची बाई म्हणते-कल  प्रॉब्लम हो गया था, बहुत टेन्शन होता है.तिला जर म्हटलं की --इतवार को जल्दी आना तर कळत नाही. ती म्हणते --सन्डे बोलो न आंटी. 

आता ह्या परिस्थितीला आपण हे मानायचं का की भाषेचा दर्जा घसरतो   आहे ? खरं तर भाषेच्या बाबतीत असा ओरडा नेहमी चालू असतो.खराब भाषा आणि चांगली भाषा कोणती ? हे मुळात ठरवणार कोण ? मी वर जी उदाहरणं दिली आहेत , त्या बद्दल तरुण म्हणू शकतात की ही अशी भाषा वापरणं  आम्हाला गरजेचं आहे, कारण आमची पिढी ''जागतिकीकरणात वाढलेली पिढी'' आहे. काही अंशी त्यांचं म्हणणं बरोबर आहे कारण इंग्रजी आत्मसात केल्या विना त्यांना काही गत्यन्तर नाही.हे दृश्य फक्त शहरातच नव्हे तर खेडोपाडी सुद्धा दिसायला लागलं आहे. फेसबुक,व्हाट्स ऐप सारख्या माध्यमांत तर बोलली जाणारी किंवा लिहिली जाणारी  भाषा कमीत कमी वापरली जात आहे. तेथे इमोजी किंवा इमोजीटीकॉनची रेलचेल दिसते आणि हे लोण आता सर्व वयोगटात पसरत चाललं आहे. 

भाषेची  ही  पध्दत   सर्वस्वी चूक ठरणार नाही, कारण भाषेचा वापर मुळात  आपली बाजू इतरांपुढे मांडण्यासाठी केला जातो.तिची रचना तशीच असायला हवी की ज्या योगे कमीत कमी  वेळात आपण सम्प्रेषित होऊ शकू.त्या दृष्टीने नवीन माध्यमांसाठी ही भाषा उपयुक्त म्हटली जाऊ शकते, पण सर्रास त्याचा उपयोग केल्याने भाषेचा गाभा आणि पर्यायाने सम्पूर्ण संस्कृती  बदलण्याचे संकट उभे राहू शकते. ही  शक्यता नाकारता नाही येणार कारण ती  अगदीच बिनबुडाची नाही.

इथे हा प्रश्न देखील उभा केला जाऊ शकतो की आपण आज ज्या भाषेला शुद्ध म्हणतो ती तरी आपल्या मूळ स्वरूपात कोठे आहे ? हा तर्क जरी मान्य केला तर त्यातून एक नवा प्रश्न निर्माण होतो की भाषेच्या  विकासाकडे आपली पावलं वळत आहे की परतीच्या प्रवासाकडे ?  आपले पूर्वज अशीच सांकेतिक भाषा वापरत होते. वर्षानुवर्षे भाषेच्या उत्क्रांतीसाठी प्रयत्न केले गेले आणि एक अभिजात भाषा निर्मित झाली. आपण त्या भाषेला सुरुंग लावायला निघालो आहोंत का ? 

भाषेपुढे एक नवीन संकट अजून उभे आहे. नवीन पिढीतील पत्रकार  इंग्रजीचा सर्रास  वापर करतात आणि त्याला मालक/संपादक ह्यांची संमती असते. मला आठवतं जवळ जवळ २५ वर्षांपूर्वी  मी जेंव्हा पत्रकारिता करत होते तेंव्हा एखाद्या शब्दा बद्दल जर काही शंका  आली तर इंदौरहून निघणाऱ्या ''नई दुनिया'' ह्या वृत्तपत्राकडे आम्ही धाव घेत असू. ''नई दुनिया''ने  वापरलेला शब्द किंवा ह्या वृत्तपत्राची भाषा  प्रमाण भाषा मानली  जायची. हेच वृत्तपत्र आता पंतप्रधानाला पी एम, विमान कोसळलं तर क्रॅश,सारखे शब्द वापरतं  इतकंच नाही तर रोमन लिपीचा वापर सुद्धा मुबलक  होताना दिसतो. इथे पुन्हा एक कळीचा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो की आजच्या पिढीला हीच भाषा समजते. जर एखाद्या शब्दाचा योग्य पर्याय उपलब्धच नसेल तर गोष्ट वेगळी पण असलेले शब्द सोडून मुद्दाम इंग्रजी शब्द वापरणे योग्य आहे का ? हा प्रश्न देखील उरतोच.

एक नवा प्रश्न अजून येतो की भाषेत असणारा आशय महत्वाचा की त्यात वापरलेले शब्द ? नक्कीच आशय अधिक महत्वाचा आहे, पण म्हणून शब्दांचे महत्व कमी होत नाही. भाषेत भेसळ करणारी मंडळी ह्याच्या विरोधात म्हणतात की भाषेला हवं तसं बहरू द्यावं. पण हे सांगत असताना ते  विसरतात की बहरण वेगळं आणि फुलून येणं वेगळं. 

भाषेचा नीट, सूक्ष्म अर्थच्छटांसह वापर होताना दिसत नाही.हा काळ संक्रमणाचा काळ आहे,म्हणून कदाचित हे बदल आपल्याला पचनी पडत नाहीय.पुढील पिढीला ही भाषा अनोळखी वाटणार नाही, ती त्यांच्या अंगवळणी पडलेली असेल, पण एक मात्र नक्की की आज ब्राम्ही किंवा पालीत लिहिलेले शिलालेख असो किंवा मोडीत लिहिलेली जुनी ऐतिहासिक पत्रं असो, आपल्याला वाचता येत नाही, त्यातील तपशील जाणून घेण्यास आपण मुकलो आहोंत तसेच पुढील पिढीचे पण नुकसान होणार आहे. विशेष म्हणजे बोलण्याची किंवा रोजच्या व्यवहाराची भाषा वेगळी आणि साहित्याची भाषा वेगळी हे साधे सोपे गणित देखील आता विसरायला होत आहे. सवलत किती घ्यायची ह्याचे भान उरलेले दिसत नाही.तंत्र ज्ञानाचा वापर करता करता भाषेचा वापरही एक ''टूल'' म्हणूनच  होत आहे. विशेष म्हणजे तरुण पिढीवर हा ठपका ठेवत असताना जुनी पिढी सुद्धा भाषेच्या बाबतीत हलगर्जी झालेली दिसते. नव्या साहित्यात नव्या प्रतिमांचा चपखल वापर होताना दृष्टीस पडत आहे.पण भाषेचा  असा उपयोग मागील पिढी करत नसून , नुसतीच हेळसांड होत  आहे. हे सर्व आपल्याला दिसत आहे, जाणवतंय पण आपण सर्वच हतबल आहोंत ही खरी शोकांतिका आहे. 
---------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment