१९८१ ते २०००

१.निखारे २.अप्राप्य रकाना ३.अहो श्रीमती साने ! ४.आठवण ५.भाऊ! बोलव न परत एकदा  ६.नुसता डोकावून गेला पाऊस जाता जाता  





निखारे

मी सकाळी स्वयंपाक करत होते
तेंव्हा माझ्या मुलीने
माझ्याकडे खेळणे मागितले
मी तिला विस्तव दिला
दिले दोन जळजळीत निखारे

तिने खुशाल ते हातात धरले
अन ती खेळत राहिली
त्या निखाऱ्यांशी 
त्यांची राख फुंकून फुंकून 

तिचे हात पोळले नाही
तिने थयथयाट केला नाही
की तिच्या हातावर
एव्हढासा फोड देखील उठला नाही

तिची नाळ आगीशीच जोडलेली होती 
तिथूनच शिकून आली होती
विस्तवाशी खेळणं
अग्निदिव्यातून जाणं !!!
-------------------- १ एप्रिल १९८१ 

अप्राप्य रकाना 

लहानपणी खेळत असताना 
आईने बोलावलं 
कोथिंबीर चिरायला 
पहिल्यांदा थोडी बाजूला पडले 
भावंडांपासून 

मग कोथिंबिरी बरोबर 
अलगद मिरच्या लिंबू वगैरे आले 
तरी सगळं झटपट आवरून 
असायची मी सज्ज 
कधी बुद्धिबळाचा डाव 
तर कधी तावातावानं गप्पा 
राजकारणावर मारायला

अगं! ताक घुसळून घेते का जरा? 
भाजी परतशील? 
तेवढं वरण छान घोटून घे 
कणिक तिंबून देशील का 
पोळ्या लाटते भराभरा 

आईच्या सूचना वाढत गेल्या हळूहळू 
मला पडावं लागलं बाहेर 
त्यांच्या खेळातून, कुटुंबातून, आयुष्यातून 

वन्संना बसायला खुर्ची दे रे!
ए! आत्या साठी पाणी आण गं 
बाहेरच्या खोलीत सरबराई पाव्हण्यासारखी 
आणि 'तुम्ही राहू द्या हो' च्या निनादात 
जराशानं माझी लुडबुड स्वयंपाकघरात
सांगायचं असायचं मला 
की केला होता इथेच स्वयंपाक 
चिरली होती इथेच भाजी 

नंतर होत गेले त्यांच्यासाठी 
परकी त्रयस्थ 
तरीही एक होता घट्ट दुवा 
होते मी अजूनही लेक कोणाची 
बांधलेले होतो आम्ही एकाच नाळेनं 
सुखवून जायचं हे तथ्यही कधीमधी 

पण नाळ ज्यादिवशी कापली 
त्याच दिवशी तुटली होती 
कचकन जाणवले एक दिवशी 
जेव्हा  वैयक्तिक रकान्यात 
शोकाकुल मी नव्हते 
अंत्यक्रियेपासून श्राद्धकर्मापर्यंत 
कोठेही मी नव्हते 

खरंतर पहिल्यांदा कोथिंबीर चिरायला 
मला बोलावलं 
तेव्हाच कळायला हवं होतं 
की नाळ एकच असली 
तरी हक्क सारखे नसतात.
कोथिंबीर चिरणारे 
आणि तिचा वापर करणारे 
हात वेगवेगळे असतात.
-------------------------- ४ ऑक्टोबर १९९६

अहो श्रीमती साने !

श्रीमती साने !
तुम्ही नेहमीच गंडाने पछाडलेल्या असता हो 
तुम्हाला जर कोणी अव्हेरलं 
तर तुम्हाला वाटतं 
तुमची काही किंमतच नाहीय 
कोणी जराशी नजर चुकविली 
तर वाटततुम्हाला टाळल जातंय 
कोणी जरासं वाईट बोललं तर वाटतं 
तुम्ही काही करूच शकत नाही 
श्रीमती साने !
तुम्ही नेहमीच कां गंडाने पछाडलेल्या असता हो ?

जराशी कोणी आस्थेनं चौकशी केली 
तर वाटतं त्याचे प्रेम आहे तुमच्या वर 
बोललं कोणी मायेनं
तर तुम्ही ओल्याचिंब होता स्नेहानं
लावलं कोणी नावाच्या पुढे ''जी''
तर तुम्हाला वाटतं 
आदर आहे त्याला तुमच्या बद्दल 
श्रीमती साने !तुम्ही नेहमीच कशा  गंडाने पछाडलेल्या असता हो ?

श्रीमती साने !
तुम्ही सहज राहूच शकत नाही का ?
समतोल राखूच शकत नाही का ?

अहो श्रीमती साने ! 
तुम्ही त्याच आणि तशाच  राहणार आहांत 
वागू द्या ज्याला जसे  वागायचे तसे 
तुम्ही कशाला गंडाने पछाडता ?
श्रीमती साने, अहो श्रीमती साने !
-------------------- ९ जुलै १९९९

आठवण 

एखादी आठवण असतेच आयुष्यात 
खिडकीच्या गजासारखी 
की जिच्याशिवाय पाहताच येत नाही पलीकडे. 
कितीही डोकं आपटलं  
तरी ती असते अविचल 
नि शेवट आपणच होतो रक्तबंबाळ 

ती येत राहते दिवसभराच्या संवादात 
विसंवादी सुरासारखी 
आठवण सम्पतही नाही कधी 
रात्रि उरलेल्या पळीभर 
कालवणासारखी. 

ती येते  अंथरुणापर्यंत 
सोबत करते रात्रभर 
गुलाबी थंडीच्या हव्या / नकोशा पांघरुणासारखी. 

तू कर सोबत आयुष्यभर 
पण अशी छळू नकोस बये !
मी तुला सजवेन 
साजासारखी अंगावर 
नेसेन सुन्दर साडीसारखी 
बसवेन लाडाने डोक्यावर 
पांघरेन उबदार दुलईसारखी 
पण तू घेऊन येत जा आपल्या सोबत 
तुझ्या महाकाव्यातल्या पात्रांना 

मी तुला 
जपून ठेवेन रेशीम कापडात 
दुर्मिळ  ग्रन्थासारखी. 
-------------------- २८ ऑक्टोबर १९९९

भाऊ! बोलव न परत एकदा 

भाऊ! बोलव न परत एकदा 
राखी पौर्णिमेला 
परत एकदा गाजवून टाक वस्ती
मी येण्याच्या वार्तेनं
लागू दे तुझ्या घरी रीघ 
मला भेटणाऱ्यांची 
दे काही दिवस वापरायला 
परत माझी खोली 
भरून टाक त्या खोलीला 
रागदारीच्या सीडीजनी 
कवितेच्या पुस्तकांनी.
आण एक सुंदरशी साडी 
वड्यांसाठी फोड चांगले आठ/दहा नारळ
आणून ठेव बासमती तांदूळ
केशरीभातासाठी.

संध्याकाळी बसू आपण 
जुन्या झोपाळ्याच्या दिवाणावर 
आठवू आई-वडिलांचे बोलणे,
त्यांच्या सवयी,त्यांची लकब 
सांगू आपल्या मुलांना त्यांच्या बद्दल.

मला माहीत आहे 
माझ्या येण्याने 
तुला खूप तोशीस पडणार आहे.

राखी पाठवली असती 
मी तुला नेहमी प्रमाणे 
पण तो कितीही रेशीम असला 
तरी दोराच असतो.
आपल्यातली गाठ तर पक्की आहेच रे !
पण तुझ्या सोबतीने 
मला परत एकदा मिरवायच आहे 
हक्कानं त्या घरात.

भाऊ! बोलावशील न परत एकदा राखी पौर्णिमेला ....

-------------------- २८ ऑक्टोबर १९९९

नुसता डोकावून गेला पाऊस

नुसता डोकावून गेला पाऊस जाता जाता
जसं विरून गेलं स्वप्न पाहता पाहता

थांबला असता जरा वेळ
तर भरून घेतले असते कलश रितेपणाचे
निथळून घेतलं असतं स्वतःलाच
चिंबली असती जमीन
पेरले असते दाणे
काढून टाकले असते अपयशाचे डाग
लादी पुसता पुसता

शिखरावर पोहचलेले
लोट उडवत गेलेय जवळूनच
माखलेला चेहरा
स्वच्छ धुवून निघाला असता

बहरलं असतं एखादं झाड
फुलून आला असता कोणतातरी कोपरा
खिडकी जवळ बसून घोटा घोटानं
रिचवला असता निदान हुंदका

नुसता डोकावून गेला पाऊस जाता जाता
जसा निघून गेला  कोणी मित्र जवळ बसता बसता.

-------------------- २९ जून २०००





No comments:

Post a Comment