२०११ ते २०२१

 वडिलांचे वाडवडिल होणे


वडील जोवर
वडील होते
नित्य नेमाने
आमच्या आठवणीत होते

हळूहळू वडील
वाडवडिल झाले
पूज्यनीय झाले
पण दिनक्रमातून वजा झाले

त्यांच्या शेवटच्या दिवसात
मान वळवून
धोतराच्या सोग्याने
अनेकदा त्यांना
डोळे पुसताना
बघितले होते

माझे आताचे
आणि त्यांचे
त्या वेळीचे शल्य
एकाच जातकुळीचे ?
------------------ २१ जुलै २०२१

पारंब्या 

मुलं लहान असताना  
खातात बोलणी  
कधी कधी 
कारण नसताना 

ती मोठी होतात 
परतफेड करतात 
अगदी आठवणीने 

झाडाच्या पारंब्या 
खाल मानेनं जातात 
जमिनीपर्यंत 
हळूहळू फुटते पालवी 
नि झाड भरून जातं 
त्याच जुन्या पद्धतीने 
--------------- २६ जून २०२१ 


उलघाल श्वासांची.   


पावलं उचलली 
पावलं अडखळली 
मधे फक्त गहिरे 
रान जीवाचे 

कधी जळ नभातले 
असे दाटले अंतरी 
मधे फक्त उघडझाप 
नयनांची

झेप अवकाशात 
जीव सापडे वादळात 
मधे फक्त निर्वात 
अंबरीचा 

वाट फुटली अशी 
सापडेना कशी 
मधे फक्त माया 
अंधाराची 

येताना अबोध 
जाताना दुर्बोध 
मधे फक्त उलघाल 
श्वासांची. 

---------------------१३ ऑगस्ट २०२०

पृथ्वी आणि  ती

ऊब मिळावी म्हणून  
पृथ्वी घालत असते 
सारख्या फे-या.

एकदा तिनेही 
असंच करायचं ठरवलं 
तर तिलाच म्हटलं गेलं
चारित्र्य नसलेली
कुलटा, बाजारबसवी 
वगैरे वगैरे. 
--------------- २० जून २०२०

तेव्हापासून
एकदा त्रेतात भेटला
नंतर द्वापरात
डोळ्याखाली काळी वर्तुळे बघून 
म्हणालास
जागत असते काय रात्रभर 
निघताना बजावले
काकडीच्या चकत्या ठेव डोळ्याखाली

तेव्हापासून
काकडीच्या चकत्या करण्यातच
तिचे दिवस संपत आहेत.
************************** ६ जून  २०२०


कोण येईल पाठीशी

लिहिणं बिहिणं सुटलं आधीच
त्यातच हा पाहुणा (कोरोना)आला
नाकी नाही तोंडी नाही
सरळ जाऊन डोक्यात बसला

हसणे बिसणे काही नाही
रुसणे नाही भेटणे नाही
फिरणे बिरणे मागे राहिले
डोळ्यात क्षणाची आसही नाही

लक्ष्मीबाई होऊ म्हणते
जिजाऊ बनून राहते
संगणकाच्या पटलावर
असते प्रतिमा धुते बिते

हा  जाईलही पडद्यामागे
सावरणं बिवरणं राहील
श्वासामध्ये श्वास मिसळूनी
आता कोण पाठीशी येईल.
-------------------- १४ मे २०२०

तुम्ही

तुम्ही
चालला आहात का
रस्त्यावरून एकटे मध्यरात्री ?
नाही ?
मग तुम्ही मुकला आहात
वाट्टेल ते करण्यापासून
जे  करू शकला असता
तुम्ही बिनधास्त
आणि करताना
कोणी बघितलंही नसतं.

वाईट नका वाटून घेऊ
आपल्या घराच्या खिडकीत
एकांतात बसून
दूरवरच्या वाटेवरून
जात असलेल्या
वाहनांच्या दिव्यांकडे पाहत बसलात
तरी चालेल
मनाने तुम्ही रस्त्यावरच असणार.

करा काय वाट्टेल ते
मध्यरात्री कोण कुठे काय बघतं?

रस्ता असो वा तुमची खिडकी
तुम्ही एकटेच तर जागे असता
अख्ख्या जगात
नेहमी.
--------------------- १३  मार्च २०२०


स्वतःचंच घर उन्हात
स्वतःचंच घर उन्हात बांधावं म्हणतेय
जे आणि जसं जगायचं होतं
ते झालंय
आणि बरीच शिक्षा घ्यायची राहिलीय

फक्त त्या आधी 
एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला 
उन्हातल्या घराची काही सीमा 
तर आखलेली नाही न ?
ते कितीही मोठं असू  शकतं न ?
-------------------- २५ मार्च २०१९ 



पाऊलखुणांशिवाय शहर

शहर सुरेख दिसायला लागलं आहे
वाटा अगदी स्वच्छ 
कचऱ्याच्या कुंड्या रिकाम्या 
रस्त्याच्या कडेला पेवर्स
पादचाऱ्यांसाठी 

विभाजक रेषेच्या मध्यभागी 
फुलांनी डवरलेली मोठ मोठाली झाडं
सगळं अगदी आखीव रेखीव 

दिसलीच कोठे घाण 
तर लगेच तक्रार नोंदवता येते 
हातात असलेल्या वाक् यंत्राने
ज्याच्या त्याच्या हाती असतंच वाक् यंत्र 

जो तो सजलेला,नटलेला 
नीट नेटका, स्वच्छ 
शर्यथ  लागल्यासारखा पळत असतो 
धूळ नसलेल्या सुबक रस्त्यावरून 

रस्त्यावर इतकी  पावलं
पण कोणाच्याच पाऊलखुणा उमटत नाहीय 
तशी जागाच 
उरली नाहीय शहरात कोठेही 
आणि पाऊलखुणांशिवाय 
कोणाचं काही नडतंय 
असेही वाटत नाही. 

------------------------ १ मे २०१८ 


दाही दिशा यमाच्या

हात लडबडले होते
स्वच्छ करू म्हटलं
तर कुठे पाणीच नव्हतं
अगदी कोणाच्या डोळ्यात सुद्धा

चालून चालून
पायाचे तुकडे मोडायची वेळ आली
विसावा घ्यायला सावली सापडलीच नाही
अंतरंग ज्याचे त्याचे तापलेले होते

पोटातले कावळे
कोकलून कोकलून दमले
ती आग शांत करायला
श्राद्धाचा दिवस सुद्धा दिसला नाही कुठे

शेवटी ठरवलं
झोपावं आता दक्षिणेकडे पाय करून
तर दिशा कळलीच नाही

नंतर हे लक्षात आले की
आता दाही दिशा
यमाच्या झाल्या आहेत.

----------------१४ सेप्टेंबर  २०१७


भिंती घराच्या उंच ठेवू नको 
मोहर फुलायला तिरीप उन्हाची हवी !

एकट्यातही फुटतं खुदकन हसू
तरी सोबत खरी कोणाची हवी !

पाण्याने पाने धुतली जातात नुस्ती
बहरायला श्रावणधारच हवी !

गर्दीचा वेढा खुणावतो कैकदा 
हितगुज करायला एक साथ हवी !

अंगणात सांज स्थिरावते अलगद 
निवांत व्हायला रात्रच हवी !
-------------------- २९ जानेवारी २०१७


श्वासांचा नैवैद्य 

सावल्यांशी खेळ झाला जुना पुराणा 
या उन्हाशी आता लपंडाव खेळू.

बासरीच्या सुरांची लकेर साद घाली
काळजाच्या घरांना हळुवार फुंकर घालू.

आसवांशी नाते, जडले जिवाभावाचे 
खारवलेल्या आठवणी नीट जपून ठेवू.

वल्हं हाती आहे वादळाची तमा कशाला 
किनाऱ्याचं शेवाळ हलकेच दूर सारू.

दुःखाचं बियाणं इथं तिथं पसरलेलं
सुखाचं रोपटं त्या मातीतच लावू.

यमुनेकाठी असेलच स्वप्नांची निळाई 
गंगेसाठी कशाला  शिवाची वाट पाहू.

विठ्ठल असतो उभा कमरेवर हात ठेवूनी
नैवैद्याच्या ताटात श्वास आपला देऊ.

-------------------- ८ जानेवारी २०१७

आखीव रेखीव जात 

सूर्योदयासारखं भेटायचं
आणि सांजवातीसारखा निरोप घ्यायचा 
इतकं सगळं 
आखीव रेखीव होतं आपल्यात .
मी म्हटले होते तुला 
कधीतरी अवेळी भेटू 
तर तू अवेळी निघून गेलास 
पार पलीकडे.
शेवटी पुरूषाची जात 
बाईचं म्हणणं नेहमी 
उलटंच पाडून घ्यायचं पदरात.
-------------------- १६ जून २०१६

मीच ती 

रात्रीची नीज मी
पहाटेची लालिमा असते
सूर्यासोबत जाग घेऊनी
दुधाची पातेली असते

मग कधी मी पळी होते
कधी मी परात असते.
केरसुणी मी अंगण झाडते
परसदाराची तुळस असते .

सुरेल घंटाही मीच होते
आसमंताची मंगला असते.
माजघराची बळकट खुंटी
मी घराला तोलून असते.

--------------------------------२१ सेप्टेंबर २०१६


पृथ्वीचे नवे वर्ष 

कसा साजरा करत असेल पृथ्वी 
वर्षाचा पहिला दिवस 

पृथ्वीला तर माहीतच असणार 
कधी आली ती अस्तित्वात
आणि कधी जाणार विलयास

कसं वाटत असेल तिला 
एक वर्ष हातातून निसटल्यावर ?
की चालून चालून दमत असेल.  

गंमत  वाटत असेल का तिला 
की न थांबता 
एक चक्र  आणखी  पूर्ण झालं ?
की कपाळाचा घाम पुसत 
मोजत असेल बोटांवर 
उरलेल्या आयुष्याची वर्षं  ?
 
पृथ्वी कधी साजरा  करत असेल नवीन वर्ष 
नाताळ झाल्यावर 
गुढी पाडव्याला 
की पतेती, मोहर्रम, दिवाळीला ?

पृथ्वी वाट बघत असेल का 
हिवाळ्यात कोवळ्या उन्हाची 
शरद ऋतूत चांदण्याची ?
शेवटल्या दिवशी पूर्ण वर्षाचे चित्र 
केलिडोस्कोप सारखे येत असेल का 
तिच्या डोळ्यांसमोर ?

शेवटल्या क्षणी उल्का पिंडांचा विरह 
सतावत असेल का तिला ?
आठवत असेल का एखादी 
खळाळून वाहणारी, कोरडी झालेली  नदी 
की एखाद्या  सुपीक जमिनीचं
ओसाड होत जाणं 
धरणीकंपाच्या आधी किती वेळ 
ती थरथरली होती 
हे आठवून शहारे येत असतील का
शेवटल्या दिवशी  तिच्या अंगावर ?  

किती विचित्र वाटत असेल न पृथ्वीला 
अर्ध्या भागात नवीन वर्ष 
आणि अर्धा थांबवून ठेवायचा 
जुन्याच वर्षात 

खरंच पृथ्वी
कसा साजरा करत असेल  
वर्षाचा पहिला दिवस!!! 

-------------------------- २८ डिसेम्बर २०१५ 
(मूळ हिन्दी कवितेचा मराठी स्वानुवाद) 


खूप खूप धावपळ झाली

कपड्यांचा ढीग उपसला 
भांड्यांवर चिंच घासली

पिशव्यांची ओझी वाहिली 
परातभर कणिक मळली

पाकिटं भरून भरून ओतली 
कर्जाची दुखणी सोसली

एक एक शित जोपासला 
ठिगळांची गोधडी केली

जळमटं  झाडून टाकली 
डागडुजी करून घेतली 

गुंतवळ बरीच होती  
त्या काळजीने  रया गेली

एकीकडे  नजर गुंतली 
दुसरीकडे  वळवावी लागली

पाठ टेकायच्या आधी म्हटलं आपली चादर बदलून घ्यावी
पण ती राहिली आहे तशीच सुरकतलेली, मळलेली !!!
------------------ ----------------------------९ एप्रिल २०१५ 

श्वासांच्या भाऊ गर्दीत

कोणीतरी हात-पायाची बोटं तपासली
नंतर हळूच पहिल बोट 
पालथं ठेवलं 
श्वासांची  लय बघण्यासाठी .
मग आईकडे बघितलं
आईला  कळलं सर्व ठीक असल्याचं 

नंतर तिला जन्मभराची सवय लागली
माझ्या श्वासांवर नजर ठेवण्याची .
कुठूनशी धावत-पळत आले 
नि माझा श्वास वर खाली असला 
की ती पहिले पाह्यची
मागे कोण आहे ते 
माझा श्वास स्थिरावला की मगच 
तिचा श्वास खाली उतरायचा 

कधी सकाळी न्हाणीघरात 
वेळ लागला 
की तिला सगळं समजायचं 
माझ्या त्रस्त श्वासाने  

हळूच इकडे तिकडे बघत 
मी टाकत असलेले नि:श्वास देखील 
तिला कळले एक दिवस
मग तिने माझ्या श्वासांची रवानगी 
दुसरीकडे केली 

तिथून आल्या-आल्या 
ती माझे श्वास मोजायची 
त्यांना जोखायची 
ते अस्वस्थ असले तर
निमूट डोळे टिपून घ्यायची

ती गेली मग माझी मीच शिकले 
आपले श्वास जपायला 
कधी रोखले गेले,कधी रुतून बसले 
आणत राहिले जागेवर 
आयुष्यभराची सवय असल्यासारखी

आता श्वासांचा वेग तसा मंदावलाय 
पण निघून जाण्याची धडपड वाढलीय 
रांगत्या मुलासारखे मागे वळून वळून 
पाहत असतात श्वास 
सारखं कोणीतरी धरायला धावतं
करकचून  आवळतं
नि मी परत परत अडकते श्वासांच्या भाऊ गर्दीत. 
------------------- ३१मार्च २०१५

राघव समयी 

राघव समयी सोन फुलांनी पिवळी चादर अंथरावी ।
मंद सुगंधी समीरासंगे साद कोणाची यावी ।।

अलगद यावे मेघ आणखी गोड झांज वाजावी ।
टपटप टपटप मौक्तिक माळा सर अशी वाटावी ।।

अशा सुगंधी प्रसन्न वेळी का झाकोळून यावे ।
का वाटावी अशी उदासी ना कोणास कळावे ।।

देहाची अशी थरथर जणू वाटेमध्ये रान असावे ।
कीटक श्वापद अवती भवती ऊर भयाने भरून यावे ।।

अशाच वेळी तुझी आठवण  मला बिलगून जावी ।
दार उन्हाचे मिटता मिटता क्षितिजावरती सांज खुलावी ।।
-------------------- २७ फेब्रुवारी २०१५

तुम्ही पंच मित्र 

अनेक सल, कित्येक वळ, आनंदाचे मोहोळ घेऊन 
जग जग जगायचे 
मग पृथ्वी वरून सरळ 
आकाशात जायचे 
एक साधा सरळ प्रवास 
सर्वांना त्याचीच आस 

जाताना विचारावं नदीला, समुद्राला
तुमच्या या उधाणात किती थेंबे आमची
पापण्यातून निसटलेले 
बुबुळांचे किती मोती 

हवेला विचारावं, वाऱ्याला विचारावं 
घोंघावणाऱ्या वादळात 
किती दु:खं मिसळलेली 
कसा समीर गंधाळतो 
सुखाच्या सुरमई पानांनी 

सूर्याला सांगावं, सांगावं अग्नीला 
आमचा ताप, आमचा संताप 
त्यानेच राहते बरं का, तुमची आब 

आकाशाला सांगायला हवं
त्याच्या मनात पेरायला हवं 
तुझे ढग, तुझे इंद्रधनु
आमचेच स्वेद बिन्दु जणू 
बाई पृथ्वी !
तू सर्वात जवळची 
तूच, फक्त तूच आमची

जाता जाता एकच 
तुला म्हणून सांगते 
तुम्ही पंच मित्र 
पंचामृताचे आचमन 
आम्ही करतो आनंदाने 
तुमचेच तीर्थप्राशन 
आम्ही परत येऊ, परत जाऊ 
दुरावलो, तरीही, तुमच्यातच सामावू 
मातीतच खेळलो आयुष्य भर
मातीतच मिसळून जाऊ.
-------------------- ३१ जानेवारी २०१५


सांगायला तयार नाही 

ए.बी. रोड वर 
दिवस रात्र धावणाऱ्या 
ओव्हर  लोडेड  ट्रक सारखं आयुष्य.
 
वाटेत अनेक टोल नाके आले 
तिथे खर्ची पडलेच कमावलेले पुण्य 
खाच खळगे, उभी आडवी वळणं
तिथून निघताना अनेकदा 
प्रयत्नांची शर्यथ झाली 

वेळो वेळी आडोशाला थांबून 
मिळेल ती आणि तशी 
भाकर मोडली 
कधी घसा कोरडा पडला
कधी डोळ्यांवर 
झापड आली 
टायर किती वेळा पंक्चर झाले
आणि किती वेळा बदलले 
ह्याची मोजदादच  नाही 
कित्येक वाऱ्या झाल्या 
आग्रा ते मुंबई 
मुंबई ते आग्रा 
कमरेवर हात ठेवून 

विठ्ठल कोठे उभा होता नेमका 
कळलेच नाही  
तो सापडलाच नाही 

प्रवास चालूच आहे
ट्रकच लोडिंग अनलोडिंग 
पण अव्याहत 
अगदी तसंच
ट्रक मालकाचा धंधा जोरात 
परमिट परत परत 
नवीन करून घेतो 
कधी पोलिथिन मध्ये ठेवतो
कधी लेमिनेशन करून सांभाळतो 
कळतंच नाहीय की
रस्ता  नेमका कुठल्या दिशेला  जातो  आहे 
प्रवास कुठला आहे 
मुक्कामाचा की 
परतीचा 

मालकाचा  मिजास एव्हढा 
की सांगायला तयार नाही 
 बस, आता ही शेवटली खेप !!!
-------------------- १८ डिसेंबर २०१४ 

भुका संपत नाही

काही दिवसांपासून स्वयंपाकघर पसरत चाललंय 
आवरलं जात नाहीय 
भुका काही संपत नाहीय

स्वयंपाकघराचा पसारा इतर भागांवरही जाणवतोच 
काय आवरू/काय सोडू , कळेनासं झालंय 
एखादी चादर नीट करावी 
तर कुशन्स वाकडे-तिरपे होतात
खूप लोळत पडल्या सारखे. 

एखादा कळकट-मळकट झालेला पडदा 
कुठलीही आब न ठेवता 
नुस्ताच लोंबकळतोय असं वाटतं
त्या कुशन्स आणि पडद्याच्या मध्ये 
मीही असतेच अस्त-व्यस्त पसरलेली 

हे सर्व आवरायला हवं हे जाणवतं 
पण भुका काही संपत नाहीय

मी परत-परत जाते स्वयंपाकघरात 
अन तिथेच अडकून पडते
दिवस चे दिवस पुढे जातायेत 
पण भुका काही संपत नाहीय

जराशी दमलेली 
काहीशी संभ्रमित मी 
कळत नाहीय 
की आतला पसारा आधी आवरू की बाहेरचा
पण भुका काही संपत नाहीय .
-------------------- ११ नोव्हेंबर २०१४ 

बीप-बीपचा नाद

आता सकाळ पासून  
बीप-बीपच्याच लयीत
सुरु होतं आयुष्य
पहाटे अलार्म निनादतो मोबाईलचा 
मी उठून बसते 
अन ज्ञान वाटणा-या
सुभाषितांनी ओथंबलेल्या
अपार संदेशांचा ओघ सुरु होण्याच्या 

मधल्या वेळेत उरकून घेते 
कराग्रे वसते लक्ष्मी वगैरे वगैरे.

मग मायक्रोवेव्हच्या पंधरा सेकंदांच्या 
बीप-बीपपूर्वी डोकावते बागेत 
सामावून घेते फुलपाखरांचे सोनेरी रंग.
 
दोन मिनिटं असली बीपला तर 
हुंगता येतो गुलाबाचा,चमेलीचा,मोगऱ्याचा 
किंवा 
रात्रभर घमघमत असलेल्या रजनीगंधाचा प्रसन्न दरवळ

त्याच वेळी कधीतरी 
कपड्याचं मशीन सांभाळतं आपली भूमिका 
त्याच्या बीपच्या अंतरामध्ये 
छान बघता येतात मागील दारी 
विजेच्या तारांवर सन्यस्त असलेले शुकराज
बीप-बीपचा नाद म्हणजे दिवसाची नांदी 
आणि त्यातच ऐकू येतो दुरून 
कोठल्या तरी देवळाचा घंटानाद.
---------------- ८ नोव्हेंबर २०१४ 

ती असेल  तुझी कविता

माहीत नाही तुला म्हणे काय असते कविता 
ये , माझ्या जवळ ये , बाळा ! मी सांगते कविता

बाप तुझा शेतात राबतो , ती असते एक कविता 
माय तुझी थापते भाकर , तीही असते एक कविता

मोठ्याने तू गाणं म्हणतो , त्याचे शब्द म्हणजे कविता 
धावतो तू फुलपाखरामागे , त्यात दडली असते कविता

बहिणीशी तू भांडत असतो , ती साजीऱ्या प्रेमाची कविता 
मित्रांशी तू जिथं खेळतो , ती माती म्हणजे कविता

अ अन्नाचा , आ आईचा , शिकून शहाणं होणं कविता 
भल्या-बुरयाची जाण येईल , ती असेल मग तुझी कविता !!!
-------------------- ३ सेप्टेंबर २०१४ 

म्हातारपण म्हणजे  

 म्हातारपण म्हणजे सन्मानानं
 खुर्चीवर बसायला मिळालेली जागा
 नको नको तो रोजच्या रोज
 आकसलेल्या  जीवनाबद्दल  त्रागा

 या छान खळखळून हसू या
 भळभळत्या जखमांना विसरून जाऊ या
डिमेन्शियाची सोय
अशा या जखमांसाठी तर  आहे

 लहानपण कसं होतं आपल्या स्मृतीत  नाही
अवखळ  लहानपण मस्त उपभोगू  आता
 लहानपण देगा देवा मागायचं कशाला

भुकेलं राह्यचं  नाही
 झोपेला चुकायचं नाही
 हसू आलं  हसून घ्यायचं
 रडू आलं रडुन घ्यायचं

 उलाढाल  करून मग हळूच  बघायचं
 हातातल्या वस्तू पडताना काय गंमत येते
 पार्किन्सन्स  म्हणजे काय लहानपणच  तर असते

डिमेन्शिया  काय, पार्किन्सन्स काय
अल्झायमर सुद्धा छानच असतो
सन्यास आश्रमाची सुरवात करून देतो. 
 खरं तर
 चष्म्याची जेव्हा गरज असते
आणि तो वेळेवर सापडत नाही
त्यालाच फक्त म्हातारपण म्हणतात
रोगांची नावं बिव
फक्त भिवविण्यासाठी असतात

अंगणात रांगोळी, दारावर तोरण
मी सज्ज आहे स्वागताला
ये ये म्हातारपण .
---------------- २ सेप्टेंबर २०१४ 


एका थांबलेल्या पावलावर 

एका थांबलेल्या पावलावर 
तुझं असणं मला अपेक्षित होतं 
पण माझं थांबलेपण 
तू गृहीत धरलं होतं 
जाणीव नेणिवेच्या पलीकडे 
असण्या नसण्याच्या तुझा सापेक्ष भाव 
मला भंडावून सोडत होता 

तू नव्हताच माझ्यासाठी 
पण असं काहीही मानण्याची ऐकण्याची 
माझी मात्र तयारी नव्हती 

तू दिसशील तिथे तिथे 
मी शोधत राहिले तुला 
जुन्या वास्तूंमध्ये जुन्या माणसांमध्ये 
तू काही केल्या सापडलाच नाही 
तुझं असणं 
मग नसल्यासारखं वाटायला लागलं 

मी अडखळत होते ठेचाळत होते 
तरी धावत होते 
तू सिद्ध होतास मला थांबविण्यासाठी 
तुझं असणं एकदाही सिद्ध करून
दाखवू शकला नाहीस 

मी मनाची दारं बुद्धीची कपाटं  
नि शरीराचा थेंब न थेंब 
तुझ्यासाठी आवरून ठेवला 
पण तू अदृश्यच राहिलास 
कोठल्यातरी भयानं 
मी ग्रासली जावी म्हणून 
कधीतरी कोणीतरी देतो दाखला 
तुझ्या असण्याचा 
साक्ष पटवतो तुझी  

माझा आता तुझ्यावरचाच नाही 
तर तुझी साक्ष देणाऱ्यांवरचासुद्धा 
विश्वास उडालाय 
तू ये किंवा नको येऊस 
मी मात्र पहिल्यासारखी 
थांबणार नाहीय तुझ्यासाठी 
----------------------११ ऑगस्ट २०१४ 

कृष्णमुरारी 

तुझी सावली होऊन आले रे मी तुझ्या दारी 
भेटला रे तू अवचित होऊन माझा कृष्णमुरारी

सूर व्हावे तुझे अन निनादत  जावे अंतरी 
आळवण्यास मला तू उचलली तुझी बासरी 

मी धारेच्या विरुद्ध नि  तू प्रवाहाचा सोबती 
कधी होणार भेट आपली आता  यमुनातीरी 

उमगलेच नाही मला तू निघून गेलास दूर 
वाटेकडे लागले डोळे मला म्हणतात बावरी 

तुझी प्रतिमा अंधुक उंच त्या सौधावरी 
युगानुयुगे नजर शोधते अजूनही भिरभिरी 
--------------------------- ४ ऑगस्ट २०१४ 

कुठे असतोस रे हल्ली 

कुठे असतोस रे हल्ली 
काही हजार वर्षांपूर्वी 
म्हणे इथेच असायचा 
इथल्याच गल्ली-बोळांतून फिरायचा 
पण तेंव्हा सुद्धा तू आमच्या बरोबर / आमच्यासाठी नसायचाच रे ! 

ती माझी बहिण, सीता 
तिला भंडावून सोडलस रे तू 
तुझ्यासाठी किती केलं तिनं 
सारखी तुझ्या मागे-पुढे असायची 
पण तू तिला सरळ हाकलून दिलंस 
अन ती राधा 
तिला सोडून कुठल्या कुठं निघून गेलास 

कुठे ती मथुरा , कुठे ती द्वारका 
सिंहासनाची हाव तुझी सुटलीच नाही 
सीतेच्या वेळेसही नाही / राधेच्या वेळेसही नाही 

सुदामा, तुझा लाडका मित्र असं ऐकलं होतं 
पण त्यालाही भेटायला 
स्वत:हून गेला नाहीस कधी 
तो आला तर केव्हढा आव आणलास मैत्रीचा 

असेच खेळता रे तुम्ही आमच्या भावनांशी 
तुमची पोटं भरलेली 
त्यातच टाकायची दोन/चार शितं  
तांदळाची / पोह्याची 

कधी मित्राला उपकृत करायचं कधी धोब्याला 
कधी शबरीच्या हातून दोन घास खायचे 
कधी गवळणीचे लोणी 
किती उपकार न तुझे आमच्यावर 

नंतर तर काय वैराग्यच आलं 
बायको-मुलाला सोडून जावं लागलं
कधी सिंहासनावर बसायचं म्हणून सोडायचं
तर कधी नाही बसायचं म्हणून सोडायचं 
एकूण काय आपल्या मनाप्रमाणे वागायचं

पण आता तर तेही दिसत नाही 
जाताना सांगून गेला होतास न 
की अधर्म झाल्यास परत येशील 
तुझा तर मागमूसही दिसत नाही 
म्हणजे तुझी ह्याला संमती आहे म्हणायची 
की मौनाची भाषा तू ही स्वीकारली आहेस 

सिंहासनावर बसायचं आणि मौन पाळायचं
चांगली शिकवण आहे रे तुझी 
युद्धात झोकायचं आम्हाला
अन आपण बासरी वाजवायची 
छान नीतीमत्ता रे तुझी 

तुझा धनुष तुझ्या खांद्यावरचं राहू दे 
खुशाल वाजवत राहा बासरी 
घे हातात लगाम घोड्यांची 
किंवा रहा बसून स्मितहास्य करीत डोळे बंद करून 
आम्हाला गरजचं नाहीय तुझी 
बघून घेऊ आमचं आम्ही काय ते 
आम्ही आता शिकलो आहोंत 
कसं जगायचं ते 

सिंहासनावर तू बस किंवा तुझ्या पादुका ठेव 
आमचा लढा आम्ही लढू 
पण याद राख ! 
आता कोणी सीता, कोणी राधा 
कोणी यशोधरा, कोणी सुदामा 
कोणी कर्ण,कोणी भरत जन्मालाच येणार नाहीयेत 
मरण नाही पण जन्म 
आम्ही आमच्या काबूत केलाय 
तू आपल्या सिंहासनाचे तेव्हढे बघ म्हणजे झालं
------------------- १ ऑगस्ट २०१४ 


विखरून गेल्या स्मृती 

मुठीत मावल्याच नाही विखरून  गेल्या स्मृती 
इंद्रधनूचे सारे रंग दाखवून गेल्या स्मृती

जाणीव-नेणिवेच्या पलीकडे भेटवून गेल्या स्मृती 
तोल ढळता-ढळता सावरून गेल्या स्मृती

समोर सावलीशी दिसली बावरून गेल्या स्मृती 
तमाची छाया घनदाट उजळून गेल्या स्मृती

वियोगाचा वणवा उरी पेटवून गेल्या स्मृती 
ती शेज शरांचीच होती जगवून गेल्या स्मृती

कोमेजले  आत काही उमलून गेल्या स्मृती 
साथ सोडणार नाही सांगून गेल्या स्मृती
--------------------- १० जुलै २०१४ 


घरचं ते घरचंच

शेवटी घरचं ते घरचंच
मी तुला आतून  बघायचा प्रयत्न केला 
तर तू निसटलास 
माझ्या हातातून 
मटारच्या दाण्यासारखा 
कोथिम्बिरीचा  सुवास द्यायचा होता तुला 
पण तू मला हिरवी मिरची समजून 
दूर सारत राहिलास 

मला काही 
मलई - कोफ्ता , कढाई - पनीर किंवा शाही बैंगन 
व्हायचं नव्हतं रे !
पण तू मला आलं- लसूणा  इतकी सुद्धा
 किंमत दिली नाहीस .
मी पिवळ्या धम्म वरण भातासारखीच बरी 

तेव्हढी  साथ असू दे रे !  
वेडी म्हणून सांगते
शेवटी घरचं ते घरचंच असतं !!
---------------------------------१९ जून २०१४ 


असाध्य रोगाने ग्रसित

अगदीच कंटाळा आलाय खाली वाकायचा
त्यांची यशस्वी वाटचाल जोखायला 
किती दिवस बघायच्या त्यांच्या पायाच्या भेगा 
किती दिवस ओशाळं हसू हसत
हात जोडायचे त्यांच्या समोर 
किती दिवस झेलायची त्यांची 
नकोशी आशीर्वचनं

मग अगदी ठरवूनच टाकलं 
नाही वाकायचं

पण नंतर काही दिवसांनी 
''ताठ मान '' हा शब्दच बाहेर गेला जगातून 
कोठे गेला कळलेच नाही 
आणि हळू-हळू अगदी दिसेनासा झाला

जमवत होते कशीबशी ताठमानेविना 
तर एक दिवशी काडकन आवाज आला 
  पाठीचा कणा मोडल्याचे समजले
पण ताठ मानेचा  हव्यास  काही सुटला नाही

हल्लीच एका जाणकाराने 
 गळ्यात हळूच एक टेग अडकवलाय
''असाध्य रोगाने ग्रसित''
-------------------- ९ जून २०१४ 

हिशेबाची चळत 

पुन्हा एकदा सूर मारून पाहू का 
कमान पुन्हा हाती धरून पाहू का

जे पत्र कधी कोणासही पाठवू शकले नाही 
त्याच्या उत्तराचे पाठांतर करून घेऊ का

आठवणींचे दोर शाबूत आहे अजुनी
पतंगाची दिशा आता ठरवून टाकू का

ज्यांची लक्तरे नीट जपून ठेवली उरी 
त्यांचीच गोधडी त्यांना पांघरून देऊ का

सूर्याला दिसतच नाही पसरलेला अंधार 
हाती आलेल्या मशाली पेटवून घेऊ का

नदीचे पाणी कसे मचूळ झालेय आणखी 
स्वच्छ वस्त्रे काठावरच उतरून ठेवू का

एकेका श्वासाची किंमत मोजली भरपूर आहे 
हिशेबाची चळत तशीच पाठवून देऊ का
------------------- ८ जून २०१४ 

मागे केव्हा बोलला होता ?

मागे केव्हा बोलला होता आठवतंय ? 
काय बोलला होता आठवतंय ?
कसे बोलला होता आठवतंय ?

बोलून बोलून काय होते 
हे नका विचारू 
बोलण्याने काही होत नाही हे नका सांगू 
बोलाची कढी बोलाचा भात 
होतो होतो त्यानेही तृप्तीचा आभास  
बोला बोला बोला हो !

आता वेळ आली आहे बोलायची 
गप्प किती दिवस राहणार 
स्वगत पुरे झालं 
मंथन पुरे झालं 

तळमळीने बोला 
भरभरून बोलला 
आक्रंदन बोला 
झरझर बोला 
भरभर बोला 
बोला बोला बोला हो ! 

डोक्यावरचं पाणी 
नाकातोंडात जायच्या आधी बोला 

ते तान्हुले  बघतायेत तुमच्याकडे 
ते चिमुकले बघतायेत तुमच्याकडे 
तोंड फक्त खाण्यासाठी नाही 
जीभ फक्त लाळेसाठी नाही 
दात एकच असतात खाण्याचे नि दाखविण्याचे 
कळले पाहिजे त्यांना म्हणून बोला 

ते तरुण पाहतायेत तुमच्याकडे 
त्या मुली शोधत आहेत तुम्हाला 
रक्त फक्त उसळण्यासाठी नसतं 
काळजातून भळा भळा वाहण्यासाठी नसतं 
त्यांचं रक्त जपण्यासाठी तरी 
बोला बोला बोला हो !

बोला काहीतरी बोला 
ते ताई दादा 
ते काका काकू 
ती मावशी आत्या 
आजी आजोबा 
त्यांना कौतुक आहे हो तुमचे 
त्यांना वाटतात तुमचे बोल भरवशाचे 
आता लेखणी पुरे झाली 
बोटांची चपळाई पुरे झाली 
तावातावाने मारलेल्या गप्पा पुरे झाल्या 

त्यांच्यासाठी बोला 
यांच्यासाठी बोला 
स्वतःसाठी बोला 
सर्वांसाठी बोला 
कुठे तरी बोला 
कधी तरी बोला 
केव्हा तरी बोला 

बोला बोला हो बोला 
आता तरी बोला
बोलाच
नक्की बोला 
-------------------- १२ एप्रिल २०१४ 


तमाशे

आयुष्यभर जगाचे हेच तमाशे पाहिले
आग लावून तेच सांत्वन करत राहिले 

भरल्यापोटी त्यांनी घास तृप्तीचे भरविले 
हवे होते जेव्हा काही तेव्हा भुकेली ठेविले 

वाट काटेरी असते असे पढवित राहिले 
पायाखाली त्यांच्या मखमली गलीचे पाहिले 

फुलं असावी बागेत फांदीवर सुशोभित 
गळ्यात हार घालून ते मिरवित राहिले 

ताठ असावे तुम्ही ही ताकीद देत राहिले 
सवारी पाहून समोर मान तुकवत राहिले 

काळ्याकुट्ट रस्त्यावर सोडून दिले धावण्यास 
पिसांच्या गादीवर ते शांत झोपून राहिले 

जा पुढे जा पुढे घोषणांचे चौफेर नगाडे 
हात बांधून मागे पाय ओढत राहिले 

भरोसा दिला पाठीवर हात ठेवून त्यांनी 
सरकले जरा चुलीपासून दूध उतून सांडले 
-------------------- ९ जानेवारी २०१४ 

शंभर वर्ष जगून तो काय करणार ?
 (आपण बरयाच वेळा दूधवाला, पेपरवाला , भाजीवाला , प्लम्बर , इलेकट्रिशिअन वगैरेची वाट बघत असतो नि तो आला की आपल्या तोंडून अवचित निघते -- आलास ? शंभर वर्ष आयुष्य बाबा ! त्या वरुन सुचलेल्या काही ओळी )
शंभर वर्ष जगून तो काय करणार ? 

संध्याकाळी घरी गेल्यावर 
दिवसभरात मलूल झालेली भाजी 
खाऊ घालणार मुला-बाळांना
की कधी तीही नाही असे सांगणार
शंभर वर्ष जगून तो काय करणार ?
महागाई वर ओरडणार
आपला फाटका खिसा चाचपडणार
की धडपडत तसाच चालत राहणार
शंभर वर्ष जगून तो काय करणार ?
आपली चार चाकी गाडी ढकलत
जवळून जाणाऱ्या गाड्यांना नुसते पाहत राहणार
की अजून किती रस्ता तुडवायचाय
ह्याच विवंचनेत दिवस काढणार ?
शंभर वर्ष जगून तो काय करणार ?
दुसऱ्यांनी टाकलेल्या सामानाने
आपला संसार सजविणार
अंथरुण नाही पांघरूण नाही
मुटकुळं करून झोपणार
शंभर वर्ष जगून तो काय करणार ?
आला दिवस पुढे ढकलणार
मागच्याचा विचार नाही , पुढच्यासाठी स्वप्नं नाही
मावळत्या सूर्याकडे नुसता पाहत बसणार
शंभर वर्ष जगून तो काय करणार ?
त्याच्या साठी फुले नाही , बाग नाही
तारे नाही , चन्द्र नाही
पक्ष्यांचे थवे नाही ,गाईंचे हम्बरणे नाही
निसर्ग त्याच्या आजु-बाजु , दॄश्यं तशीच सरकत जाणार
शंभर वर्ष जगून तो काय करणार ?
दोन पायांवर बसून आभाळाकडे पाहणार
पाझर फुटेल त्याला ह्या विश्वासावर जगणार
बेभरवशाच्या आयुष्याची लय कशी सांभाळणार
शंभर वर्ष जगून तो काय करणार ?

जगणं असतं स्वतःसाठी
हे भान त्याला नसणार
त्याने जगावे आमच्यासाठी
हे आम्ही त्याला शिकविणार
आमच्या ताठ मानेसाठी
तो नेहमी खाली वाकणार
शंभर वर्ष जगून तो काय करणार ?
-------------------- १२ डिसेंबर २०१३ 

कधी-कधी भावतो मनाला अंधार 
अंधाराला एक गंध असतो 
एक रंग असतो 
एक आकार असतो 
अंधार तोला-मोलाचा असतो 
नजरेत सामावणार नाही 
इतका अफाट असतो

खूप भरून येतं तेंव्हा 
सगळंच नकोसं होतं
सगळं सोडता येतं 
पण अंधार सुटत नाही 
तो राहतो सोबतीला 

पण अंधारात दिसत नाही प्रतिबिम्ब 
नसतो झगझगाट 
नसते रोषणाई 
कणभर सुद्धा वैभव दिसत नाही 
पण आपल्याला हवे असलेले आकार 
मात्र अंधारातच असतात
अंधारात लपून राहता येतं 
नि आपल्याला बघता येतं उघड्या डोळ्यांनी जगाला

अंधारात विसावा देतात मालकंस , बागेश्रीचे स्वर 
ओलावा देते भैरवी 
कवितेच्या सुन्दर ओळी आठवतात 
अन काही वेळेस 
छान ओळी सुचतात सुद्धा
कधी खूप रडू कोसळतं
पण मनाची तळे स्वच्छ होतात 
मन उजळतं 
अन एका अमावस्येला हा मिट्ट अंधार 
दिवाळी होऊन जातो.
-------------------- २४ सेप्टेंबर २०१३ 

सन्यस्त वाट वेगळ्याने धरायची कशाला 
एक सूफी संत आत दडलेलाच असतो

यावे ऋतूंसारखे नि बरसून निघून जावे 
आठवावे गेलेल्याला तोच खरा वाटाड्या होतो

स्मृतींची कागदे आपली आपणच फेकून द्यावी 
हा पसारा कधीतरी आवरायचाच असतो

जगण्याच्या प्रश्नांना सामोरा गेलाच होता नेहमी 
तू कुठल्या चिंतेन मग असा भयभीत होतो

निरवा-निरवीची भाषा नावडती असली तरीही 
मंगलवाद्याचा सूर त्यातच निनादत असतो

संचिताचे हिशेब कधी मांडले नाही तरी 
ज्याने केली बेरीज गोळा तोच मग वजा होतो

अक्षरे कशी बावनकशी त्यावर सोनेरी वर्ख असतो 
शब्द त्यांचे झाले की मान होतो अवमान होतो.
-------------------- १ ऑगस्ट २०१३ 

हिशेब

वेचलेल्या क्षणांचा हिशेब काय 
गमावलेल्या आयुष्याचा हिशेब काय 

कुणाला द्यायची कुणाशी मागायची कैफियत 
जे जगायचं राहून गेलं त्याचा हिशेब काय 

जमाखर्चाच्या पावत्या आवरण्यात हशील काय 
सर्व संचितच संपून गेले त्याचा हिशेब काय 

काल नव्हता आज आहे उद्या नसेल त्याचा भरवसा काय 
श्वासांची पोकळी तशीच राहिली त्याचा हिशेब काय
------------------- २७ जून २०१३ 


नवे गाणे भुलाबाईचे 

माझी आई बाई होती बाई होती 
माझी मुलगी बाई होणार बाई होणार 
मी पण एक बाई गं  बाई गं 

बाया सगळ्या सारख्या गं  सारख्या गं 
सकाळी उठून काय करतात काय करतात 
कोंबड्यासारखं आरवतात आरवतात 
सगळ्या घराला जागवतात जागवतात 
सर्वांसाठी जेवण रांधतात जेवण रांधतात 
आधी वाढतात दुसऱ्यांना दुसऱ्यांना 
स्वतः नंतर जेवतात नंतर जेवतात 
शिळंपाकं संपवतात संपवतात 

मोलकरीण नसेल तर काय करतात काय करतात 
कामाचा ढीग उपसतात उपसतात 
मदतीचा हात मिळतो का मिळतो का 
नकार त्या पचवितात पचवितात 

माझी आई घरी असायची घरी असायची 
मी पडले बाहेर बाहेर 
लेक कधी थांबलीच नाही थांबलीच नाही 

आमचं जगणं एक सारखं एक सारखं 
पायंडा काही बदलत नाही बदलत नाही 
उजेड काही दिसत नाही दिसत नाही 
असंच जगणं शिकत असतात शिकत असतात 
शिकता शिकता जगून घेतात जगून घेतात 
श्वास असाच घेत राहायचा घेत राहायचा 
एक दिवस सोडून द्यायचा सोडून द्यायचा 

काहीच कोठे घडत नाही बदलत नाही 
मूळ प्रश्न सुटत नाही सुटत नाही 
आता नात मोठी होतेय मोठी होतेय 
माझी काळजी संपत नाही संपत नाही 
हाताच्या रेषा बदलत नाही बदलत नाही 
-------------------- १९ एप्रिल २०१३ 

तुझं जीवन म्हणजे निर्लेप तव्यासारखं 
कोठेही चिकटणार नाही असं
कमळाच्या पानावर पाण्याचा थेंब नाचतो 
तेव्हढाच संबंध तुझा आयुष्याशी 
पण तुला व्हायचं असतं शिंपल्यातला मोती 
 सगळं इतकं असं सोपं नसतं

कधीतरी धरा होऊन बघ 
कधीतरी सोहा होऊन बघ 
वर्षानुवर्ष आसा भोवती फिरावं लागतं
आत-आत गर्भात शिरावं लागतं 
तेंव्हा कुठे मोत्याचं खपलं गवसतं
गर्भाशी नातं सांगण वेगळं
अन गर्भाला तळहातावर घेऊन जगणं वेगळं
अगदी वेगळं ......
--------------------------------- ७ मार्च २०१३ 

खुदु खुदु हसण्याऱ्या मुली गेल्या कुठे ?

ओंजळीत तोंड लपवून खुदु खुदु हसण्याऱ्या मुली गेल्या कुठे ? 

मुली आता खूप मोठ्याने हसतात 
मान उंच करून हातावर टाळी देत हसतात 
ज्या बाहेर येऊ शकल्या नाहीत 
त्या होत्या का खुदु खुदु हसण्याऱ्या मुली ? 
की त्यांचे हसू दाबले गेले खूप दिवस 
म्हणून हसतात त्या आता नेहमी जल्लोष असल्यासारख्या 

एखाद्याकडे पाहून लाजणाऱ्या , 
पायाने जमीन खुरडणाऱ्या , 
उगाच पदर सावरणाऱ्या मुली गेल्या कुठे ? 

की त्यांना सांगितले गेले 
पदर नेहमी डोईवर घ्यायला 
नेहमी अंगभर लपेटून घ्यायला 
म्हणून भिरकावून दिला त्यांनी पदर 
सोडून दिले पदर सावरत उगाच लाजणे 
आईची साडी अंगावर सावरत 
घरभर बागडणाऱ्या मुली गेल्या कुठे ? 

आता रस्त्या-रस्त्यात भरधाव धावणाऱ्या मुली दिसतात 
चौका-चौकात मेणबत्ती लावत घोषणा करणाऱ्या मुली दिसतात 
संध्याकाळी स्वयंपाकघरात लुडबुड करणाऱ्या मुली गेल्या कुठे ? 
आई सोबत समईची वात नीट करणाऱ्या मुली गेल्या कुठे ? 
मुली सारख्या निरागस दिसणाऱ्या मुली गेल्या कुठे ?
ओंजळीत तोंड लपवून खुदु खुदु हसण्याऱ्या मुली गेल्या कुठे ? 
------------------ १६ फेब्रुवारी २०१३ 


घुमू लागतो पावा

काय होणार ते 
असं समोर दिसू लागलं 
टीव्हीचा पडदा  उघडल्यावर 
मागील अंकातील दिसतं तसं 
एकदा असं देखील वाटलं 
मागील पानावरून पुढे चालू आहे 
मग एकदमच आभाळ भरून आलं 
कुठलातरी गोंगाट घराच्या दारावर आदळावा 
तसं वारं सुटलं सुसाट 
चालताना नुसते दिसत राहिले 
धुळीचे लोटचे लोट 
अन त्यातून एक विवर 

पण झाडे मात्र डोलत होती 
हिरव्यागार पानांनी लगडलेली 
कुठे कुठे एखादं डेरेदार 
फूलही होतं 
जीविताची ती एक आशा होती कायम 

मग परत एकदा 
अंधार वाटू लागला 
गळा दाटून आल्यासारखा वाटला 
पण विवराच्या बाहेर 
तेवत होती एक पणती 
एक तुळशीचं  झाडही होतं तिथे 
नंतर बासरीचे स्वर निनादू लागले हळुवार 
गोष्ट एकदम पालटावी तसं काहीसं 

उगाच घाबरायला होतं कधीकधी 
आभाळ भरून येणं काय 
किंवा सुसाट वारा काय 
सगळं  असतच एकमेकात गुंतलेलं 
वाटेत दिसलेली पालवी, हिरवं  झाड 
आणि पणती 
आठवणीत राहू दिली 
की मग आपोआपच 
घुमू लागतो पावा कोठेतरी 
---------------------- २१ जानेवारी २०१३ 


असा एक एक जण निघून गेला 

एक जण काल गेला
एक जण परवा गेला 
एक त्याही आधी गेला 
असा एक एक जण निघून गेला 

तो म्हणाला दमलोय 
पडतो क्षणभर 
दिसलाच नाही 
बसलेला नंतर 
जाणाऱ्याचा श्वास 
उरलेल्याच्या घशात अडकला 
असा एक एक जण निघून गेला 

काही पाने होती हिरवी
काही अगदी देठाशी 
रात्र रात्र मागे ठेवून
दिवसासारखा निघून गेला 
असा एक एक जण निघून गेला 

निरभ्र होते आकाश
पावसाची चाहूल नव्हती 
अंगणात घराच्या मात्र 
नको तितका बरसून गेला 
असा एक एक जण निघून गेला 

जाताना 'येतो' नाही 
पुन्हा भेटू हेही नाही 
पायाखालच्या रस्त्यासारखा 
सहज उठून निघून गेला 
असा एक एक जण निघून गेला......  

---------------------- २२ डिसेंबर २०१२

कळले नाही

धुळवड अशीच राहणार का गुलालासारखी 
की शुभ्र वस्त्र लेवून आज  जाता येईल घरी 

हनुवटीवर बोट ठेवून प्रश्नांचे नृत्य पाहिले 
उत्तराच्या शोधात करत राहिले लयकारी 

चुकांच्या पुढेही असतेच करावयास काही 
उंचावून टाचा पाहिली ती  यशाची सवारी 

संभ्रमाचे दिवे पेटत राहिले मन रानात 
दिशाहीन होते तरी धुंडाळल्या दिशा चारी 

प्रेमाने हाक मारली विखरून साद गेली 
भांडायलासुद्धा लागते एक सोबत खरी 

खूप मारले टोमणे खूप दिले शिव्याशाप 
शत्रुत्व दाखविण्यासही आले न कोणी दारी 

देवावर भरवसा  काही फारसा वाटला नाही 
कळले नाही कोण मग दुखणी काढेल सारी 

---------------------------------------- ३० जून २०१२


आम्ही नसतोच कोठेही

रडण्याचे कड थांबत नाहीये 
फक्त अश्रु सुकलेय 
दुःखाचे पदर बदलले असतील 
पण पोत तितकेच गहिरे गहिवरलेले 
आम्ही आसुसून झोंबतोय त्यांच्या पदराला 
पण ते दंग आहेत हवे तसे नाचायला 
कधी तमाशा कधी नौटंकी 
त्यांचं नाचणं देखील मनाला न भावणारं 
बेताल लास्य नसलेलं 
वाट बघायची त्यांचा धुमाकूळ थांबण्याची 

कधीतरी पांढरा रंग नांदेल 
कधीतरी हिरवी समृद्धी येईल 
आमच्याही वाट्याला 
कधीतरी केशरी बाणा वागवता येईल 
आम्हालाही आपल्या खांद्यावर 
कधीतरी होऊ आम्ही या गणाचे तंत्र 
कधीतरी धावता येईल आम्हाला 
सुटेल त्या वाटेनं 
कधीतरी आम्हीही घेऊ मोकळा श्वास 

आम्ही फक्त धावत आहोंत सतत 
ऐकत आहोंत श्वास रोखून आपल्याच बद्दल 
पण आम्ही नसतोच कोठेही चर्चेत 

दबा धरून बसले आहेत असंख्य कीटक 
आणि त्यांची भीती वाटते  श्वापदासारखी 
खूप कुत्री भुंकत आहेत आजुबाजू 
सापाची बिळंही फोफावली आहेत 
आणि आम्ही पडलोय झोपेचं सोंग घेऊन 
आपलं रडणं आतल्या आत रिचवत 
-------------------- १९ मार्च २०१२


आपआपले दैवत 

आईच्या कुशीतून निघून 
आले या जगात 
आई म्हणाली देवाने घडवले आपल्याला 
देवाला ना तिने बघितले ना मी बघितले 
पण आईचा विश्वास देवावर 
आणि माझा आईवर 
तेंव्हापासून माझी नजर 
सतत आकाशाकडे 

कित्येक काळ्याकुट्ट रात्रींच्या 
भयावह शांततेत 
आई म्हणायची वर बघ 
तुला दिसत नसला 
तरी उजेड असतो तिथे 
आईची श्रद्धा उजेडावर 
आणि माझी आईवर 
मी परत परत 
विश्वास ठेवत राहिले 
आईच्या सांगण्यावर 

हळूहळू हे असं सर्व 
सवयीत आलं 
वर बघणं 
जणू अंगवळणी पडलं 

देवाचं माझ्यावर अतोनात प्रेम होतं 
त्याला वाटायचं 
मी बघत राहावं त्याच्याकडे 
सतत नेहमी 
तो अधून मधून 
मला संमोहितसुद्धा करायचा 
जादूची कांडी फिरवत राहायचा 
वळणावळणावर माझा वाटाड्या व्हायचा 

अशीच मी मस्त मजेत 
विसावत राहिले आईच्या खांद्यावर 
विसंबत राहिले देवाच्या करणीवर 

मग एके दिवशी 
देव घेऊन गेला आईला 
आता दोघं एकत्र असतात 
आणि मी अजूनही बघत असते 
वर देवाकडे आईकडे 
भूमीवरून अवकाशाकडे 
-------------------- २६ फेब्रुवारी २०१२

साथ चंद्राची : वाट सूर्याची 

करावयाचा नसतो भरोसा अनुभवांचा 
ते जरा काहीसे मनमौजीच वाटतात 

असतातच सर्वांच्या हातात अनेक  रेषा 
कां कोणाच्या काही अशा लपून बसतात 

दिसतो कोणी एक शहाणा चतुर चलाख 
तरी त्याला पाहून कां भाव सारे नासतात 

नीज आली की चालते सोबत कोणाचीही 
रात्र जागवताना मात्र डोळे एकटे असतात 

साद घालायला असते एकच घंटा पुरेशी 
प्रत्युत्तर देताना आधी चेहरे बघितले जातात 

चंद्र देतो साथ निमूट रात्रीच्या अंधारात 
तरी शेवटी सगळे सूर्याची वाट पाहतात 
------------------- १० डिसेंबर २०११

काय करायचे आता 

काय करायचे नवीन अध्याय जोडून आता 
आहे तीच पाने नीट वाचून घेऊ आता 

डोंगर चढून झालाय आता व्हावे पायउतार 
मागून येणाऱ्यांना वाट मोकळी सोडू आता 

आकाशातले तारे मोजणे  आहे  व्यर्थ
उजेडाची तिरीपच आपली म्हणू आता

नको वाटतो पावलांना काठीचा आधार 
मळवाटेवरच चालू सांभाळून आता

गेलेल्या दिवसांचे हिशेब मांडायचे कशाला 
सुखाने उलटून घेऊ हीच दैनंदिनी आता

कुसळ होते किती आणि तण वाढले किती 
ताज्या गुलाबांचे ताटवे फुलवून घेऊ आता

नवी स्वप्न डोळ्या पुढे येत नसली तरीही 
जुन्या स्वप्नांसाठीच छान झोप घेऊ आता

सारेच बंध काही तोडता येत नाही
मग कशाला कोणावर रागवायचे आता
-------------------- १० डिसेंबर२०११

तांत्रिक जगाच्या बाता 

नुकतंच उजाडलं होतं 
उशाशी ठेवलेल्या मोबाईलवर 
एस एम एस निनादला 
नेमाने रोज येणारा मेसेज 
अन् ओघाने येणारी जाग 
बाहेर बातमीपत्र टाकल्याचाही 
आवाज आला 
हातात ब्रश घेऊन बाहेर गेले 
बातमीपत्र उचललं 
ब्रश करता करता 
जेव्हढं वाचता आलं 
तेव्हढं वाचलं 
तोंड धुतलं 
चहाचं आधण ठेवलं 
परत एक एसेमेस 
हेही रोजचंच 
चहा पिता पिता 
एकीकडे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, स्थानिक 
बातम्या आणि दुसरीकडे 
एसेमेसचा प्रवाह 

नंतर रोजच्या कामाला लागले 
थोड्या वेळात सगळं शांत झालं 
मग फोन वाजला 
कुठलेतरी आमंत्रण 
माझ्या कार्यालयात कोणाचं 
काहीतरी काम 
किंवा एखाद वेळेस 
बहिण भाऊ नणंद जाऊ 
हेही रोजचंच 

संध्याकाळी घरी परतले 
दाराशी काही टपाल 
नेमाने येणारी काही पाकीटं 
आत आले 
टीव्ही चालू केला 
बातम्या पाहिल्या 
बंद केला 
संध्याकाळची कामं केली 
जेवले परत थोडा टीव्ही 
नंतर कम्प्युटर 
मेल चेक केलं 
फेसबुक स्टेटस अपडेट केलं 

झोपायची वेळ झाली होती 
दिवा घालवताना 
सहज नजर गेली 
सगळ्या खोलीकडे 
टेबलावर 
दोन चार वृत्तपत्रं आणि मासिकं 
काही लिफाफे पुस्तकं 
तिथेच ठेवलेला रेडिओ 
उशाशी मोबाईल 
एका भिंतीशी टीव्ही 
लगतच कंप्युटर 

दिवसभर केवढी 
जोडली जाते मी जगाशी 
तरीही कोणालाही माहीत नसतं 
काय चाललंय माझ्या आत 
आणि मलाही माहित नसतं 
त्यांच्याबद्दल काहीही 

माझी आई 
दिवसभरात केंव्हातरी 
एखादं वृत्तपत्र 
तेव्हढं वाचायची 
पण कोणीही पुढ्यात आलं 
की बरोबर ओळखायची 
त्याचं खदखदणारं मन 
-------------------- १३ नोव्हेंबर २०११

स्वागत, स्नुषा स्वागत !

तू येणार ह्या वार्तेन 
चैतन्याचे झरे वाहू लागले आहेत 
आनंदाचे मोती सांडत आहेत 
केंव्हाही गळून पडतील 
अशी पिवळी पानेही 
पुन्हा नटायला लागली आहेत हिरव्या रंगान
ह्या ओसाड रानात 
 सामसूम होती 
शुष्क होतं सगळंच वातावरण 
तुझ्या रुणुझुणु चाहूलीचा सुस्वर नाद 
भरायला लागला आहे आसमंतात 
तुझा ताजेपणा 
तुझं माधुर्य 
तुझी देखणी किणकिण
जाणवतेय सगळ्यांच्याच हालचालीत 
तू येणार येणार 
म्हणता म्हणता
ती मंगल घटिका आली
ऊर सर्वांचाच दाटायला लागला आहे 
पण तू परत परत 
मागे वळून पाहू नकोस
पावलांना फार वेळ अडखळू देऊ नकोस
'माझं घर कोणतं'
ह्या संभ्रमात राहू नकोस.
ते घर तुझं होतच 
आता नवीन घराची 
प्रशस्त  दारं तुझी वाट बघत आहेत 
तू आपल्या हाताने उघडावी
म्हणून थबकली आहेत 
उंबरठा थांबला आहे 
लक्ष्मीच्या पावलांसाठी 
तुला फक्त एक पाऊल उचलायचं आहे 
मग घरातल्या माणसांसकट 
आतलं संपूर्ण विश्व 
 फक्त तुझं आणि  तुझंच ....
---------------- ३० जानेवारी २०११

घेतला वसा टाकू नकोस !

मला आठवतं 
बोट सोडून  धावायचास
आणि मागे वळून पहायचास
आता बोट नाही
अख्खा  हात धरायचाय तुला
तो सोडून पळण्याचा विचारही मनात आणू नकोस 
कधी सोडायची वेळ आलीच तर 
 बोट सोड 
पण हात सोडू नकोस

हे कधी विसरू नकोस 
की तू जेंव्हा बोट धरायचास  
तुला विश्वास सापडायचा 
आता तुला हात धरून
भरवसा सौपवायचा आहे 

नुस्ता हातच नाही 
तर पावलंही उचलायची आहेत बरोबरीन
तेंव्हा वेग थोडा कमी असला तर असू दे 
थोडा थांब हवं तर 
पण  पाऊल उचलताना 
साथ मात्र सोडू नकोस 
हातात हात, सोबतीला  पावलं
तरी रस्ता सरळच असेल 
असं नाही 
चढ उतार,खाच खळगे 
खूप येतील मध्ये मध्ये 
दमछाक होईल अगदी कधीतरी 
पण घेतला वसा मात्र टाकू नकोस
थोडं धीराने  घे,
थोडं सबूरीने घे 
रागाची बोळवण कर पाहुण्यासारखी 
आनंदाच्या वाटा खूप असतात 
त्या शोधायला विसरू नकोस 
जा,पुढे जा 
आपल्या गौरीला घेऊन ये
लक्ष्मीला घेऊन ये 
आता मागे वळून पाहू नकोस 
आम्ही सर्व आहोंतच तुझ्या सोबतीला 
ती, जी सर्वांना सोडून येतेय 
तिला मात्र अंतर देऊ नकोस
 हात धरला आहेस 
तो कधी सोडू नकोस 
 लक्षात असू दे 
घेतला वसा टाकू नकोस !!!
--------------------- ३० जानेवारी २०११ 


No comments:

Post a Comment