२००१ ते २०१०

१.अंधार,उजेड आणि सावल्या २.तुला सांगायचे राहून गेले ३.मराठी कवन ४.पुन्हा खेळ निखाऱ्यांशी  ५.निरागस प्रश्न  ६.गलबलून येईल आरशांना  ७.मी एक पिशवी  ८.नव्याने समजले  होते  ९.यूज अँड थ्रोच्या काळात  १०.पावसाळा ११.आपण  सगळेच


 अंधार,उजेड आणि सावल्या 

त्या तिथं उजवीकडे
ठेवलीय मेणबत्ती
तू सांगितलंस 
पण तिथं पोहचल्यानंतर
तुझ्या सांगण्या नि माझ्या मेणबत्ती लावण्याच्या मध्ये
काळोख पसरून राहिला होता

मेणबत्ती लावल्यानंतरही
खूप उजेड झाला नाही
पण अंधाराला व्यापलं त्यानं

तिथं ठेवलेल्या काही-बाही सामानाची
आणि खुद्द माझीही सावली
अडवित होती उजेडाला
तेंव्हा पहिल्यांदाच 
मला माझं एकटं असणं आवडून गेलं
कोणाच्या असण्यानं
सावल्यांमध्येच भर पडणार होती.

सावली पडण्यात एकट्या मेणबत्तीचा हात नसला
आणि उजेडाच्या संदर्भात आपली कुवत
मेणबत्ती इतकीसुद्धा नसली 
तरी
''ही इथे नाही तिथे ठेवायला हवी होती'' म्हणत
एकमेकांवर उगाच चिडलो असतो आपण.
नंतर त्या काळोखातून निघालो असतो
खूप दमल्याचा, संघर्ष केल्याचा
आव चेहऱ्यावर आणीत
नि येउन बसलो असतो सूर्यप्रकाशात 
हाश-हुश्श करीत

तसं पाहिलं तर
सूर्याच्या उजेडात सुद्धा सावल्या असतातच
आणि अंधारही
काही अगदी सगळा नाहीसा होत नाही
पण सूर्याच्या समोर
जरा वेळ उभं राहण्याची पण
ताकद आपल्या अंगी नसतेच.

म्हणून मग आपण एकमेकांकडे बघून
हसलो असतो मंदसं
नि बोलत राहिलो असतो खूप वेळ 
अंधाराचे विषय टाळत
अभिजातपणे

 आतला अंधार
राहिला असता तसाच
किंवा हळू-हळू होत गेला असता
याहून अधिक गडद. 
-------------३ जानेवारी २००१

तुला सांगायचे राहून गेले

माझीही कोर होती भिजलेली तुला सांगायचे राहून गेले 
चेहऱ्या मागच्या चेहऱ्याबद्दल तुला सांगायचे राहून गेले

तू पाहिलीत ओल्या गवतावर माझी सुरेख पावले 
गवता खालच्या चिखलाबद्दल तुला सांगायचे राहून गेले 

पारदर्शी काचा आतून दिसला पाऊस मस्त रिमझिम 
एक काच फुटकी होती तुला सांगायचे राहून गेले

गाभ्यारात उतरल्यावर होतं एक शांत सरोवर 
तापलेल्या छताबद्दल तुला सांगायचे राहून गेले

घरात रंगली होती गप्पांची छान मैफल 
एका मूक कोपऱ्याबद्दल तुला सांगायचे राहून गेले

दुतर्फा झाडांनी वेढलेला होता रस्ता 
एका निर्वात प्रवासाबद्दल तुला सांगायचे राहून गेले

भरजरी पदरांनी सजवलेली होती आरास 
दांडी वरच्या जुनेराबद्दल तुला सांगायचे राहून गेले.

-------------------- २४ एप्रिल २००१ 

मराठी कवन 

मराठी मेळवावी।
मराठी बोलवावी। 
मराठी वसे हृदयी।
सहजी ग।।

मराठीचा उदित सूर्य ।
मराठीचा शितळ चंद्र ।
मराठीचा मंद समीर।
वाहू द्यावा।।

इये बृहन्महाराष्ट्री।
बोले मराठी बोल ।
सांभाळी सान थोर।
कवतुके ।।

मराठी आमुची माय।
मराठी आमुची धाय ।
अमृत ऐसी दुग्ध धार।
संचितावी ।।
-------------------- २० जून  २००१ 

पुन्हा खेळ निखाऱ्यांशी 

तुला आठवतं
तू लहान असताना
तुला खेळायला निखारे दिले होते मी
तू खूप दिवस खेळत राहिली होतीस
त्या निखाऱ्यांशी
त्यांची राख फुंकून फुंकून

तो अग्नी, तो विस्तव जपून ठेवलाय न ?
एखादी ठिणगी जरी असेल न
तरी  ती पुरेशी आहे
निखारे अजूनही फुलवायचे आहेत
विस्तव अजूनही धगधगता  ठेवायचा आहे.

शोध, शोध, नीट शोध
सापडेल कोठेतरी ती आग
तुझ्या पिंडातच सामावलेला होता
जोस धग सांभाळायचा

हाताच्या कंपाने
डोळ्याच्या पाण्याने
ती विझू देऊ नकोस
लहानपणीचे खेळ
आता नव्याने सांभाळायची वेळ आली आहे.

घे ते निखारे हातावर
पेर बियाणे आगीच्या पिकासाठी
तुला आता परत निखारे फुलवायचे आहेत.
---------------------- २६ जानेवारी २००१ 

निरागस प्रश्न

कृष्ण पक्षाच्या एका रात्री 
त्याचा निरागस प्रश्न
चांदोबा कुठे गेला ?
मी गमतीने माझ्या मुठीत असल्याचे सांगितले 
त्याने बळेच माझी मूठ उघडली 
नि एका छानदार आविर्भावात 
चंद्र आपल्या मुठीत जतन केला 

तेव्हढ्यात गुरलीन म्हणाली 
मला दे चंद्र 
त्याने अभिमानाने , ईश्वराच्या थाटात 
चंद्र तिच्या स्वाधीन केला 

मग त्या मुठीत त्याने 
अलगद तारे धरले 
तजिन्दर, तन्वी , रौनक , अमन सर्वांनी 
एकच गलका केला 
मला दे , मला दे
गौरव तसाच राहून गेला 
त्याला न चंद्र मिळाला , न तारे 

त्याने आपल्या कोवळ्या मिठीत मला विचारले 
मला काहीच का नाही मिळाले ग ?
त्याला समजावणं कठीणच की 
नक्षत्रांच देणं असं सगळ्यांनाच लाभत नाही 

उद्या बहुधा गौरवच्या मुठीत येतील चंद्र -तारे 
नि अंगद तसाच राहील रिता , रिकामा
-------------------- ३ जून २००२

गलबलून येईल आरशांना 

घरभर आरसे लावून घ्यावे
कोणीतरी सोबतीला असल्यासारखे तरी वाटेल
नंतर सीडी लावून वावरावं सगळीकडे 
रिकाम्या भिंती शोषून घेतील एकूण एक स्वर 
आवाजाची तेव्हढीच सवय राहील कानांना 

अगदीच काही नाही सुचलं तर 
खिडक्यांचे पडदे दूर सारावे 
झाडांच्या सावल्या बागडतील तावदानांवर 
पुस्तकांचे गठ्ठे काढावे आवरायला 
कधीतरी आलेलं पत्र सापडेल त्यात 

आपल्या लेंड लाईनने 
आपलाच मोबाईल जुळवावा 
नि नंतर मोबाईलने आपला लेंड लाईन 
दोन कॉल आल्याचे मिळेल समाधान 

स्वयंपाक थोडा जास्त करावा 
अन्नाच्या भांड्यांनीसुद्धा घर गजबजतं कधी-कधी 
संध्याकाळी समई मात्र लावावी 
सावली सोबत करेल शेवट पर्यंत

पण उगाच गुढघ्यात डोकं तेव्हढं  देऊ नये 
गलबलून येईल आरशांना .
-------------------- १६ जुलै २००२

 मी एक पिशवी 
जेंव्हा ओसंडून वाहत होते
हवी-हवीशी होते
रिकामी झाले
तेंव्हा टांगली गेले खुंटीवर बाजूला 
सुरवातीला मला दफ्तरच समजलं सर्वांनी 
नि ज्ञानाचे भले थोरले पुंजके 
कोंबले माझ्यात 
मग वर्गपाठ अन गृहपाठाच्या
वह्याही ठेवल्या गेल्या रीतसर
कधी शाईने डागाळायची मी
तर कधी कंपासची उपकरणं बोचायची
पण शिकवणी कधी चुकविता आली नाही 
नंतर प्रत्येकाची भूक शमविण्याची 
जबाबदारी टाकली गेली माझ्यावर 
कधी डाळ-तांदूळ कधी कांदे-बटाटे 
पिशवीत हात घातला 
की असायलाच पाहीजे काहीतरी हमखास
नाहीतर मग भिरकाविले जायचे रागानं कोपऱ्यात
कधी-कधी कंटाळा यायचा गप बसायचा
पण माझ्यात पहिले पासून 
गिरविले गेलेले धडे 
त्यांचा वापर करायची
मुभा मात्र नव्हती अजिबात 
जास्त काही बाहेर यायला लागलं
तर चटकन सुतळीनं बांधायचं 
किंवा सुई-दोऱ्यान शिवून टाकायचं तोंड माझं
नि नंतर ''काही नाही होणार - काही नाही होणार''
म्हणत हात झटकून मोकळं व्हायचं एकेकानं
प्रत्येकाची सुख-दुःखं
गाऱ्हाणी-बतावणी 
चुगल्या-कागाळ्या 
अगदी तळाशी टाकून द्यायच्या 
लपवून ठेवायच्या चंचीसारख्या 
अन ओझं जास्त झालं 
बंद तुटला तर
सुया बोचून घ्यायच्या स्वतालाच 
हळूहळू झिजले जुनेरासारखी 
छिद्रं पडली इथं-तिथं
मजबूती कमी झाली 
पण तरी असावी जवळ
म्हणून गुंडाळून घडी घालून 
बाळगतंच कोणीतरी 
कदाचित येईल काही
कामी नव्या प्रवासात 
कोठे साचली धूळ तर
साफ करता येईल 
किंवा दमल्यासारखे झाले
तर विसावता येईल अंथरून 
मायेच्या गोधडी सारखं. -------------------- ९ फेब्रुवारी २००९

नव्याने समजले  होते.

उंबरठे मला कधीच  ओलांडायचे  नव्हते 
क्षणभर तुझ्या  ओसरीवर विसावयाचे होते.  
 
उदबत्तीच्या धुराने सुद्धा डोळे पाणावत होते 
बाहेर कोसळत्या धारा अन आत कोरडे होते. 

श्वासात अडकलेले  सारखे वेडावत होते
ते हुंदके नव्हते हे नेमके कळले होते. 

एक तुझीच आठवण असे काही नव्हते
जगण्याच्या वेगाचे बोल वेगळेच होते. 

माणसाला एकट्याने जगताना पाहिले होते 
मला मात्र नव्याने पुन्हा समजले  होते.
-------------------- १९ जुलै २००९

यूज अँड थ्रोच्या काळात 

सकाळी गॅस वर 
चहाचं भांडं ठेवलं 
की लख्खकन नाव चमकतं त्यावर 
देसाई यांज कडून 
मग दिवसभर कितीतरी नावं 
वेगवेगळ्या भांड्यांवर दिसतात 
कुलकर्णी यांज करून 
जोशी यांज कडून 
देशपांडे यांजकडून 

आता इतक्या वर्षांनंतर 
काही नावांच्या मागचे 
चेहरे देखील आठवत नाहीये 
पण हे नक्की 
की ही मंडळी तेव्हा खूप जवळची होती 
माझी त्यांना काळजी होती 
माझ्या संसाराबद्दल आपुलकी होती 
अगदी ठरवून एकमेकांना विचारून 
त्यांनी निरनिराळ्या भांड्यांनी 
माझी गिरस्ती सजवली होती 

आता कुठे बरं असतील देसाई कुटुंबीय
कुलकर्णी काका असतील का अजून हयात 
जोशी देशपांडे यांचेही झालंच असेल वय आता 

चहाच्या भांड्यावरची वाफ वितळते 
तसे देसाई गळले कधीतरी 
आप्तेष्टांच्या यादीमधून 
मग एकदा लाट आली तूप कमी खायची 
तसं डॉक्टरांनी सांगितल्यासारखे 
तुपाचं भांडं देणारे 
कुलकर्णी काका काकू 
विस्मरणात गेले 

घराच्या साफसफाईत 
ती जुनी भांडी कधीतरी निघतात 
मी हरखून त्यांच्यावरची 
नावं वाचायला लागते 
एखादंच भांडं असतं त्यात 
माझ्या नावाचं 
पण तरीही त्या कोरलेल्या नावांवर 
हात फिरवताना छान वाटते  

नॉनस्टिक मायक्रोवेव्हच्या बिन नावाच्या 
भांड्यांसोबत संसार करणाऱ्या 
माझ्या लेकी सुना 
मुलगा जावई 
हसतात माझ्या हळुवारपणाला 

त्यांना समजावता येत नाही मला 
की देसाई जोशी देशपांडे कुलकर्णी 
ही फक्त नाव नाहीयेत 
पडद्यामागे असली तरी 
माझ्या आयुष्याच्या सोहळ्यांना 
त्यांच्यामुळेच आली होती पूर्तता 
लग्न डोहाळजेवण बारसं मुंज 
सगळं असं डोळ्यासमोर येतं 
रोजचं  एकेका भांड्या बरोबर 
अन् मला गरज वाटत नाही 
अल्बम किंवा व्हिडिओची 

पण आता यूज अँड थ्रोच्या काळात 
मुलं जपतायेत फक्त माझं मन 
आणि मी जपू पाहतेय 
माझी भांडी आणि 
त्यामागच्या भावनादेखील 
-------------------- ११ जानेवारी २०१० 

पावसाळा

पावसाळा असा 
की कोणाला चिंब करतो 
कोणाला कोरडं करतो 
कोणी भिजतं 
कोणी थिजून जातं जागच्याजागी 
तिला वाटतं आता आभाळ 
कोसळणार तर नाही 
आणि कुठे तरी तो मात्र 
मस्त हुंगत असतो मातीचा वास 

कोणासाठी पावसाळा 
म्हणजे हिरवळ 
फुलांनी डवरलेली बाग 
भज्यांसाठी तापत 
ठेवलेली कढई 
पाण्यावर तरंगत असलेले 
तेलाचे भाव 

कोणाला वाटतं पावसाळा 
म्हणजे रक्षाबंधन पंधरा ऑगस्ट 
गौरी गणपतीचे पडसाद 

पावसाला खबर नसते कशाचीच 
बरसायचं हे एवढंच माहित 
असतं त्याला
कधी ढगातून 
कधी डोळ्यातून 
------------------- २९ जुलाई २०१०

आपण  सगळेच…... 

सकाळी सकाळी 
एक पक्षी दारात डोकावला 
अन् विचारले 
अगं अशी एकट्याने 
काय चहा पीत बसली आहेस 
काल जेवतही होतीस अशीच एकटी 
परवा पाहिलं होतं एकट्यानेच 
तुला टीव्ही बघताना 
अगं जरा बाहेर निघ 
बघ तरी 
जग किती गजबजलेलं आहे 

मी तशीच 
चहाचा कप बाजूला ठेवून 
दार उघडून बाहेर आले 
तर पूर्वेकडे सूर्य दिसला 
एकटाच उगवताना 
त्याला नमस्कार केला 
वळले तर पाठीशी चंद्रही 
तसाच एकटा 
अस्ताला जात असलेला 
सहज बघितलं तर कुंडीत 
एकच गुलाब बहरलेला 
झाडांना पाणी देण्यास 
गेले नळापाशी 
तर तोही कोणाची सोबत नसलेला 

घरात दिसले सगळीकडे 
लढत असलेले एकांडे शिलेदार 
एक टीव्ही एक सोफा 
एक गॅस एक ओटा 
एकच मिक्सर एकच ओवन 
एकच ते धुलाई यंत्र 

नंतर आठवलं पक्षी म्हणालेला 
जग बघ गजबजलेलं 
घराला कुलूप घातलं 
बाहेर आले 
तर रस्ता 
आपला लांबच लांब 
एकटाच पसरलेला 
झाडं होती दुतर्फा 
पण एकटीच मोठी झालेली 
आपणच आपली बहरलेली 
जनावरं दिसले कळपात 
पण एकमेकांकडे 
पाठ करून बसलेले 
एकटेच कुठेतरी बघत असलेले 

जग खरंच खूप गजबजलेलं होतं 
पण जो तो धावत होता एकटाच 
स्वतःमध्ये हरवलेला 
स्वतःशीच लढत असलेला 

जगाचं ते एकटेपणच 
सोबतीला आलं घरापर्यंत 

दुसऱ्या दिवशी पक्षी आपला 
परत खिडकीशी 
माझ्याकडे बघत विचारतो कसा 
गेली होतीस न काल जग बघायला ?
दिसला का जगाचा पसारा
छानसा गजबजलेला ?

हो रे बाबा ! 
खरंच जगात 
किती ही अफाट गर्दी 
पण जाणवतंय मला 
की तू देखील एकटाच 
कालही आणि आजही 
-------------------- २५ ऑगस्ट २०१०

No comments:

Post a Comment