काही छोट्या कविता

 १. 
तुला आकाशच हवं होतं 
मला माझी जमीन सोडायची नव्हती.

२.
तुझे  असणे-नसणे ,
मी फक्त अंदाजच घेत राहिले
तोवर उन्हं कलायला लागली होती.

३.
मी सकाळी धावत असते स्वयंपाक घरात 
नंतर रस्त्यावर कामावर पोहचण्यासाठी 
दिवसभर तेथेही असतेच धावाधाव 
स्वत:च्या अस्तित्वासाठी 
पहिल्यांदा माणूस कशासाठी धावला असेल?
पोटा साठी ?
दुसरयाच्या पुढे जाणयासाठी ?
की मात्र तग धरून जगण्यासाठी ?

मोबाईलची बॅटरी 

कधी - कधी मोबाईलची बॅटरी 
बोलून-बोलून रिकामी झाल्या नंतर 
खूप तापते 
अगदी चटका बसेल इतकी

आपणही बऱ्याचदा गरम होतो 
अगदी लालबुंद 
खूप वापरतो का आपण 
न बोलता असेच एकमेकांना ?
-------------------- ११जून २०१४ 

परतीच्या वाटेवर 

जगता आले नाही

रिक्त होऊन 

पण परतताना फक्त हवी 

हातांना एकमेकांची साथ 



तुझा राग तिचा द्वेष 

त्याचा मत्सर माझं मीपण 

परतीच्या वाटेवर 

आता काहीच नको अवजड 

असावे रिकामे हात

---------------------- २३ जुलै २०१४ 


स्मरण आणि विस्मरण 
आई त्रागा करायची 
''किती हाता हातात द्यायचं ''
नंतर विसरून जायची

आईचा त्रागा माझ्या लक्षात राहिला 
तुला तिचं विसरणं
स्मरण आणि विस्मरण 
आपलं नेमकं तिथेच जुंपत होतं........
-------------------- ५ ऑक्टोबर २०१५ 

काळीज
काळजाच्या अनेक तुकड्यांनी व्यापलेलं
रसरशीत, फुललेलं
कधी तृप्त
कधी दुभंगलेलं

काळीज
काळजाच्या तुकड्यांविना
व्यर्थ भासलेलं.
-------------------- ३१ ऑगस्ट २०१७




No comments:

Post a Comment